नासपती हे फळ सफरचंदाच्या आकाराचे असते. या फळाचे मूळ स्थान युरोप व आशियातील पहाडी प्रदेश, भारतात थंड पहाडी प्रदेशात नासपती लावली जाते. उत्तर पश्चिम हिमालयाच्या पायथ्याशी तसेच दक्षिण भारतामध्ये अधिक पहायला मिळते. पंजाब, काश्मीरमध्ये याची पैदास मोठ्या प्रमाणात होते. स्थानभेदाने यांचे विविध आकार व प्रकार पहायला मिळतात. गोड फळांचा खाण्यासाठी तर आंबट फळांचा
औषधासाठी उपयोग केला जातो. वीर्यवर्धक, त्रिदोषनाशक, रुचकर, कामात्तेजक, धातूवर्धक, वाताचे शमन करणारे रसायन आहे. नासपतीमुळे तृष्णा शांत होते. गोड नासपती खाल्ल्यामुळे फुफ्फुसे, हृदय व मस्तकाची दुर्बलता दूर होते. श्वेतप्रदर असणाऱ्या स्त्रियांसाठी हे फळ फायदेशीर असते. मुरडा, अतिसार व रक्ती जुलाबामध्ये याचा चांगला गुण येतो.
आंबट नासपतीमुळे जठर व यकृताला शक्ती प्राप्त होते. भूक लागते व उबग येण्याचे कमी होते. या फळाच्या सेवनाने पित्तप्रकोप शांत होतो व रक्तातील अतिरिक्त उष्णता दूर होते. याच्या बिया पौष्टीक असतात. याच्या काळ्या लाकडापासून सुंदर गृहोपयोगी वस्तू बनवल्या जातात. नासपतीचे फळ विस्तवावर भाजून त्याच्या फोडीमध्ये जिरे, मिरे मीठ घालून खाल्ल्याने भूक चांगली लागते.
हृदयासाठी पौष्टिक असणाऱ्या फळामुळे जठराची, यकृताची व फुफ्फुसाची शक्ती वाढते. मूत्राशयाचा दाह, उलटी, चक्कर, दौर्बल्य अशा विविध आजारात हे फळ अतिशय गुणकारी असते. या फळामध्ये गैलिक व टार्टारिक घटक सफरचंदापेक्षा अधिक असते. त्यामुळे आजारी माणसासाठी हे फळ सफरचंदापेक्षा गुणकारी आणि उपयोगी ठरते.
हेही वाचा : Bajra Biscuits : आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बाजरीचे मूल्यवर्धित बिस्किट्स