खरिप हंगामासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांची जमिनीच्या मशागतीसह, खते-बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. तर कृषी विभागानेही खरिपासाठी तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यात युरियासह इतर खतांची, तसेच बियाणांची टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्याला खरिपासाठी मागणीप्रमाणे 1 लाख मेट्रिक टनांचा युरिया साठा मिळालेला असून इतरही आवश्यक खतांचा पुरेसा साठा खरिपासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याशिवाय जवळपास 3 हजार 100 मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक करून ठेवण्यात येणार आहे.
खतांसाठी गर्दी झाल्यास या राखीव साठ्याचा उपयोग होणार आहे. विशषत: दुर्गम भागात पाऊस जास्त झाल्यास वाहने पोहचू शकत नाहीत, अशा भागांतील शेतकºयांना गरजेनुसार तत्काळ खत मिळण्यासाठी या राखीव युरियाचा उपयोग केला जाणार आहे. एकूणच पेरणी क्षेत्र, शेतकºयांकडून होऊ शकणारी खतांची मागणी लक्षात घेता, खरीप हंगामात खतांची कमतरता भासणार नाही. नाशिक जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांची ही माहिती दिली.
खतांवर अनुदान
केंद्रीय मंत्रीमंडळाने 2023-24च्या हंगामासाठी खतांवर अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्यासाठी 1 लाख 8 हजार कोटी अनुदानाला मंजुरी दिली आहे. अनुदानामुळे खतांच्या किंमती स्थिर राहणार असून अनुदानाची रक्कम कंपन्यांना न देता थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. दुसरीकडे अनेक पिकांच्या एम.एस.पी.मध्ये यंदा वाढ केल्याने त्याचाही शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.
शेतकरी वापरतात स्वत:चेच बियाणे
नाशिक जिल्ह्यात खरिपातील सोयाबिनचा पेरा मोठा असून दरवर्षी सुमारे 75 ते 80 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. मात्र सोयाबीनचे बियाणे पुरविणाºया कंपन्या कमी असल्याने अनेक शेतकरी हे स्वत:जवळचेच बियाणे वापरत आहेत. त्यामुळं ऐन हंगामात त्यांना बियाणांच्या टंचाईचा सामना करावा लागत नाही.
सोयाबीन हे सरळ वाण असल्याने आधीच्या हंगामातील राखून ठेवलेले स्वत:जवळचे सोयाबीनचे बियाणे शेतकरी वापरू शकतात. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात मागच्या तीन वर्षांपासून शेतकºयांनी स्वत:चे बियाणे वापरावे यासाठी व्यापक जागृती मोहीम चालविली जात असून शेतकºयांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सोयाबीनचे बियाणे कसे साठवावे, त्याची उगवणचाचणी कशी करावी यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन केले जाते. शिवाय पेरणीपूर्वी त्यांच्याकडील बियाणांच्या उगवणक्षमतेची चाचणी घेतली जाते. याशिवाय सर्वच पिकांसाठी बीजप्रक्रिया अभियान सुरू असल्याचेही कृषी विभागाने सांगितले आहे.