-रविंद्र शिऊरकर
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका म्हणजे खरिपातील लाल कांदा आणि रब्बी उन्हाळी कांद्यासाठी प्रसिद्ध भाग. या वर्षी सुरुवातीपासून पाऊस कमी झाल्याने या संपूर्ण भागातील शेत हे सध्या रब्बी कांदा हंगामात रिकामे दिसून येत आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी जमिनीची नांगरणी करून ठेवली आहे.
नांदगावचा दक्षिणेकडील भाग असलेले बाणगाव, खिर्डीपतोडे, राजापूर, सोमठाण जोश, भौरी, दहिगाव, माणिकपुंज, कसबखेडे, मोर्झर तसेच या गावांना लागून असलेले येवला तालुक्यातील भारम, ममदापूर आदी गावांत लाल कांदा आणि उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो.
मात्र, या वर्षी सुरुवातीपासून पाऊस कमी झाला तर नोव्हेंबर मधील अनेक भागात अवकाळी म्हणून झालेला पाऊस या भागांत हवा त्या स्वरूपात न बरसल्याने विहिरीतील पाणी साठे वाढण्यास मदत झाली नाही. परिणामी आता काही ठराविक विहरीतचं पिण्यापुरते पुरेल एवढेच पाणी शिल्लक असून इतर सर्व जलसाठे कोरडे झाले आहे.
हे साल आपलं नव्हतं म्हणतं चालत रहायचं आमच्या पूर्ण भागात एक टक्के सुद्धा कांदा लागवडी नाही. पाणी न झाल्याने रान खालीचं होते पण न लावता उगवणारे गाजर गवत, शिफरट यांचे बी पडतात पुढं तण वाढत म्हणून मंग नांगरणी करून घेतल्या आता जसं आहे तसे दिवस काढत हे साल आपलं नव्हतं म्हणायचं आणि चालू द्यायचं.- बापू गायकवाड (शेतकरी खिर्डी तालुका नांदगाव)