नाशिक: "आमची द्राक्ष बाग वाया गेली. त्यानंतर नेते, अधिकारी आले, पंचनामे करून गेले पण मदत मिळाली नाही. साहेब मला जमीन विकावी लागली हो... आमचं दु:ख जाणून घ्यायला कुणीच नाही, आम्ही वरून असे दिसत असलो तरी आतून पार कोसळलोय" अशा शब्दांत आपली व्यथा निवृत्ती भोसले या शेतकऱ्याने राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासमोर मांडली. त्यांचे बोलणे ऐकून कृषी आयुक्तही नि:शब्द झाले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अधिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रसलपूर येथील हे शेतकरी असून त्यांची द्राक्षाची बाग २०१६ साली वाया गेली होती. त्यावेळी नेत्यांनी आणि कृषी क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या पण मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांचं दुख ऐकण्यासाठी सध्या कुणीच नाहीये अशा शब्दांत शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. कृषी आयुक्त प्रवीण गेडाम निफाड तालुक्यातील दौऱ्यावर असताना हा प्रसंग घडला आहे. यामध्ये कृषी अधिकारी आणि शेतकरी संबंधित शेतकऱ्याच्या घरी बसलेले दिसत आहेत.
काय म्हणाला शेतकरी?
"२०१६ साली माझी द्राक्ष बाग वाया गेली, त्यानंतर आमदार, खासदार आले, कृषी अधिकारी आले, पंचनामे करून गेले पण अजून एक रूपया दिला नाही, काय करायचं आम्ही? मला जमीन विकावी लागली, छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी काय करायचं. शेतकऱ्यांना दुसरं कोणतंच उत्पन्न नाहीये. ४ आणि ५ रूपये किलोने टोमॅटो विकला जातोय. अशी शेतकऱ्यांची परिस्थिती असते का?" असं म्हणत असताना भोसले यांना रडू कोसळले.
"खिशात पैसे नसले की औषध घ्यायला गेल्यावर दुकानदारसुद्धा दारात उभा करत नाही. आधीची उधारी मागतात. वरून आम्ही तुम्हाला दिसतोय पण आम्ही आतून कोसळलोय साहेब... आमच्या व्यथा ऐकायलाच कुणी नाही. २०१५ पासून अनेक कृषी अधिकारी आले, राजकीय नेते आले, पण काही नाही, ते फक्त येतात आणि आमच्या पाठीवरून हात फिरवून निघून जातात. जे आहे ते आहेच. सरकार तर नाही पण निसर्गसुद्धा आम्हाला साथ देत नाही साहेब. आम्ही पूर्णपणे कोसळलोय." अशा शब्दांत त्यांनी आपली कैफियत मांडली.
ही एकट्या शेतकऱ्याची व्यथा नसून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा म्हणून याकडे बघितलं पाहिजे आणि यावर लाँग टर्म उपाय शोधला पाहिजे. हा प्रश्न मुळातून कसा सोडवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हा प्रश्न सुटणे हे बोलण्याएवढं सोपे नाही पण आम्ही हा प्रश्न मुळातून संपवण्यासाठी काम करत आहोत.
- डॉ. प्रवीण गेडाम (कृषी आयुक्त)