Join us

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; द्राक्ष बागेला फटका वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 10:43 AM

परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यात पुन्हा धुमाकूळ घातला. वाचा सविस्तर (Nashik Rain)

Nashik Rain : 

नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा धुमाकूळ घातला असून गुरुवार (१७ ऑक्टोबर) पासून जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने देवळा आणि सुरगाणा येथे पिकांसह घरांचे नुकसान केले आहे.

कांदा आणि भात पिकासाठी हा पाऊस नुकसानदायक असून त्याचा मोठा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान जिल्ह्यातील धरणांमधून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

हवामान खात्याने आणखी दोन दिवस अलर्ट दिला असून शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याची सूचना केली आहे. ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असतानाच शनिवारी (१९ ऑक्टोबर)रोजी जिल्ह्यात पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. तापमानात वाढ झाल्याने ऑक्टोबर हिटचा अनुभव नागरिक घेत होते. उन्हाचा चटका आणि उकाड्याने असह्य झाले होते.

दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. चार वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने जोर वाढला. संपूर्ण जिल्ह्यात हा पाऊस बरसल्याने कांद्यासह द्राक्षांच्या वेलींनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सुरगाणा येथील संजय पाटील यांच्या घराचे नुकसान झाले तर निफाड तालुक्यातील उगाव येथे बुधवारी (१६ ऑक्टोबर) रोजी वीज पडून गाय वासराचा मृत्यू झाला.

२४ तासांत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सरासरी १४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून सुरगाणा येथे सर्वाधिक २९.२ मिलिमीटर तर मालेगाव येथे २८.७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यात कळवणमध्ये २४ तर बागलाणमध्ये २१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने बहुतांश धरणातून पुन्हा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यात दारणा ३००, गंगापूर ५७१, वाकी २३२, नांदूर मधमेश्वर १६१४, वाघाड २५, तिसगाव ११, ओझरखेड २२८, पालखेड ४३७ इतक्या क्युसेकने विसर्ग सुरू आहे. जायकवाडीच्या दिशेने अजूनही नाशिकमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

लोहोणेरसह देवळा तालुक्यात चांदवडला ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चित्रा नक्षत्राच्या पावसाचे शनिवारी (१९ ऑक्टोबर) रोजी सायंकाळनंतर तुफान हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले.

चांदवड व देवळा तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक घरांमध्ये पाणी घुसले, तर चांदवडमधील दोन पाझर तलावांना नुकसान पोहोचण्याबरोबरच राहुड धरणाचा बंधारा फुटून शेतशिवाराचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाचे थैमान सुरूच होते.

पावसाने जिल्ह्यात नाशिकसह चांदवड, देवळा, कळवण, मालेगाव, मनमाड, निफाड, बागलाण, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार हजेरी लावली. रात्री १० ते ११.३० या काळात शहरात २६.२ मिमी पावसाची नोंद झाली.

चांदवड शहरात पावसामुळे व्यापारी संकुलातील गाळ्यांसह अनेक घरांमध्ये पाणी घुसले तर वडबारे परिसरात ढगफुटीसदृश पाऊस होऊन शेती पाण्याखाली गेली आहे. इनामवाडी वस्ती जवळील तामतीचे धरण (माती धरण) फुटून पाण्याच्या प्रवाहात ट्रॅक्टर व ट्रॉली वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नाशिक शहरात शनिवारी रात्री जोरदार पावसाने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

महत्त्वाच्या बाबी

* नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.

* तिसगाव गोई नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

* कापशीत अतिवृष्टीमुळे धरण धोकादायक स्थितीत.

* मनमाडला गुरुद्वारा पुलावरून पाणी वाहू लागले.

* परिसरात वीज कोसळल्याचीही घटना.

* देवळा, कळवण, बागलाण, त्र्यंबकला जोरदार हजेरी.

* चांदवडला परिस्थिती नियंत्रणात.

* नांदूरमधमेश्वर धरणातील पाण्याचा विसर्ग.

* नाशिक शहरात जनजीवन विस्कळीत.

*  मनमाड शहरात संततधार

शेतकऱ्यांकडून सरसकट पंचनाम्याची मागणी

लोहोणेरसह देवळा तालुक्यात शनिवारी (दि. १९) संध्याकाळी जोरदार पावसाने तडाखेबद्ध हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून वेळी-अवेळी पाऊस हजेरी लावत आहे.

शनिवारी सायंकाळी सहा वाजेनंतर विजेच्या कडकडाटासह तुफान पावसाने देवळा तालुक्यात सर्वत्र जोरदारपणे हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या तुफान पावसाने कांद्याचे रोप, काढलेला मका आदी पिकांना मोठा फटका बसला आहे.

महागडे टाकलेले कांदा रोप अति प्रमाणात झालेल्या पावसामुळे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा नव्याने महागडे कांदा बी घेण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली आहे.

सायंकाळी सर्वदूर झालेल्या या तुफानी वादळी वारा व विजेच्या कडकडाटामुळे विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचाही फटका बसला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने कोणताही निकष न लावता सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

नांदूरमधमेश्वर धरणातून १,६१४ क्यूसेक विसर्ग

निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्वर धरणातून शनिवारी (१९ ऑक्टोबर) रोजी रात्री नऊ वाजता १६१४ क्युसेक पूर पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिली आहे.

गोदावरी धरणातून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने दारणा धरणातून ३०० क्युसेक, तर गंगापूर धरणातून १०१९ इतका पूर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नांदूर मधमेश्वर येथील धरणात पूर पाण्याची आवक झपाट्याने होत आहे.

या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभाग व आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिली आहे. तसेच चांदोरी व ओझर परिसरातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे.

पावसामुळे द्राक्षशेतीला रोगाचा वाढला धोका

सिद्ध पिंप्री येथे सातत्याने अवेळी येणाऱ्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षाची शेती संकटात सापडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे फ्लॉवरिंग स्टेजला असलेल्या द्राक्षबागांना गळकुज होण्याची शक्यता आहे. सध्या बहुतांश द्राक्षबागांची छाटणी पूर्ण झालेली आहे.अवकाळी पावसाने डावणी रोगाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून द्राक्ष शेती संकटात आहे. शेतीवर आधारित सर्वच घटकांचे दर वाढले आहेत; परंतु शेतीमालाचे भाव मात्र अजूनही तेच आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय हा तोट्यात आहे. गेल्या दोन दिवसापासून अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना सातत्याने कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

त्यामुळे द्राक्ष शेतीच्या खर्चामध्ये सातत्याने दरवर्षी वाढ होत असल्याने पर्यायाने त्या तुलनेमध्ये शेतीमालाला दर मिळत नाही. त्यामुळे अवेळी येणाऱ्या पावसामुळे डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, फ्लॉवरिंग स्टेजला असलेल्या द्राक्षबागांची गळकुज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

अवकाळी पावसामुळे द्राक्ष शेतीला कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे कीटकनाशकांवरती ज्यादा पैसे खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. -सुरेश ढिकले, शेतकरी

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसनाशिकपीकशेतकरीशेती