Join us

आळंबी उत्पादनातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोत; विद्यापीठात पार पडले आदिवासी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 6:43 PM

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंबी उत्पादनाचा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यामध्ये जवळपास ३७ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषि विज्ञान केंद्रामार्फत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंबी उत्पादनाचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये जवळपास ३७ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यासाठी महिला शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. आदिवासी भागातील भातशेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि त्यातून व्यवसाय निर्मिती करण्यासाठी विद्यापीठाकडून हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

पाच दिवसाच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात धिंगरी आळंबीचे प्रकार, उत्पादन करण्याच्या पद्धती, रोगांचे व आद्रतेचे व्यवस्थापन, काड निर्जंतुकीकरण, पिशव्या भरण्याची पद्धत, आदी बाबींचे शास्रीय माहितीचे प्रशिक्षण आदिवासी शेतकऱ्यांना देण्यात आले.

प्रशिक्षणार्थींकडून स्वतः या बाबी करून घेण्यात आल्या. यशस्वी आळंबी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटीचेही आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना केंद्रामार्फत आळंबी उत्पादनासाठी बियाणे व पिशव्या देण्यात आल्या. 

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ३७ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षणाच्या मुख्य व्याख्याता म्हणून केंद्राच्या गृहविज्ञान तज्ञ सौ. अर्चना मोहोड यांनी काम पहिले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, कृषी अभियांत्रिकी तज्ञ राजाराम पाटील व उद्यानविद्या तज्ञ हेमराज राजपूत हे उपस्थित होते.

आदिवासी भागातील भात आधारित शेती पद्धती हि मुख्यत्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गावरील अवलंबित्व जास्त आहे. त्यातच आदिवासी महिलांच्या कामाला आर्थिक पाठबळ कमी असते. लहरी हवामानामुळे पिक उत्पादनाची शाश्वती नसणे, बाजारातील शेतमालाचे तीव्र चढउतार, आदिवासी भागात पर्यायी उत्पन्नाचे मर्यादित स्रोत यामुळे शेतकऱ्यांसाठी  विशेषतः महिलांसाठी कमी खर्चात उभारता येऊ शकणाऱ्या पर्यायी शेतीपूरक व्यवसाय निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने त्यांच्यासाठी कमी कष्टात व कमी खर्चात व्यवसाय निर्मिती व्हावी यासाठी आळंबी उत्पादनावर विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र परिश्रम घेत असल्याचे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बनसोडे यांनी सांगितले. 

महिलांनी गट स्थापन करून आळंबी व्यवसाय केल्यास व्यवस्थापन आणि तयार मालाचे विपणन ह्या गोष्टी सोप्या होतात. ग्रामीण भागात संतुलित आहाराला महत्व असल्याने आळंबीसाठी गावातच मोठ्या प्रमाणावर मागणी आहे ही या व्यवसायासाठी जमेची बाजू आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत या व्यवसायासाठी सर्व प्रकारची तांत्रिक मदत पुरविली जाईल महिलांनी आत्मविश्वासाने आळंबी उत्पादन या व्यवसायाकडे वळावे असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी केले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीविद्यापीठ