केवळ अणूभट्टी नव्हे तर इतर विविध प्रकारे अणू-रेणूंपासून सुटत बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन हे वातावरणात ऊर्जावान 'आयन्स' निर्माण करीत घातक प्रारणे म्हणजे उत्सर्जन करणे. हे संशोधन करीत असताना रक्ताचा कॅन्सर होत मृत्यू झालेल्या, रेडिओलॉजी आणि कर्करोग संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेत्या मॅडम क्युरी यांचा जन्मदिवस ७ नोव्हेंबर १८६७ होय. आता २०१४ सालापासून दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस' म्हणून पाळला जातो. कॅन्सर (कर्करोग) जागृती आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय व वैयक्तिक आरोग्य व अर्थव्यवस्था यावरील भार कमी करीत बलशाली भारत घडविणे हा यामागचा उद्देश आहे.
दररोज आमच्या प्लेटवरील चमचमीत रूचकर अन्न हे हळूहळू आपल्या शरीरात कॅन्सरजन्य घटक लपवून कॅन्सर पेरणी करतात आणि आपण बिनधास्त ते स्वीकारत आहोत. एका झटक्यात सर्व उत्पन्न, जमापुंजी आणि आर्थिक सुबत्ता हॉस्पिटलच्या आय.सी.यू. मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांची 'बिप-बिप' ऐकण्यात, तसेच जवळपास दर सहा महिन्यांनी बदलणारे सकारात्मक व नकारात्मक रिपोर्ट आणि शेअर बाजाराच्या ते दिसणारे इसीजी व इतर रिपोर्ट्स पहात झुरतझुरत एक दिवस 'आकस्मिक' डोळे मिटणारा प्रवास आपण स्वेच्छेने करीत आहोत का....?
शरीरातील असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ अशी कर्करोग म्हणजे कॅन्सरची साधी सोपी व्याख्या होय. मानव, प्राणी आणि अगदी वनस्पतींना देखील कॅन्सर होतो. कॅन्सर पेशींची शरीरातील वाढत जाणारी संख्या अनेक आजारांना आमंत्रित करते आणि रोगांचा समूह शरीराचे सामान्य कामकाज बाधित करून सजीव लवकर जीवनातून 'कॅन्सल' होतो.
'कॅन्सर' च्या पेशी या जवळच्या पेशी किंवा ऊती आणि अवयवांवर एखाद्या राक्षसासारखे आक्रमण करू लागतात आणि उपचार न केल्यास ट्यूमर बनून अनेकदा तो फुटतो आणि शरीरभर पसरून सजीवांचा वेदनादायी अंत होतो. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) च्या मते, काही कीटकनाशके, जसे की ग्लायफोसेट, मानवांसाठी कार्सिनोजेनिक म्हणून वर्गीकृत केली गेलेली आहेत. तर आफ्लाटॉक्सिन, मोल्ड्सद्वारे उत्पादित, यकृताच्या कर्करोगाशी संबंधित तसेच शास्त्रीयदृष्ट्या माहीत असलेली कार्सिनोजेन्स घटक आहेत. उच्च तापमानात पिष्टमय पदार्थ तळून किंवा बेक करण्याच्या प्रक्रियेमुळे कर्करोगाच्या जोखमीशी निगडीत ऍक्रिलामाइड हे रसायन तयार होते. तसेच PAHs सह प्रक्रिया केलेले आणि ग्रील्ड मीटचे नियमित सेवन केल्याने कोलोरेक्टल आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीय वाढतो हे मांसाहारी म्हणजे 'नॉनव्हेजिटेरीयन' लोकांना माहीत आहे का?....
अपवाद वगळता असंख्य ठिकाणी पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी गरजेपेक्षा जास्त म्हणजे ४०० पटीने अधिक कीटकनाशके, खते आणि इतरही विविध प्रकारची उत्पादन व उत्पन्न वाढविण्याच्या नावाने शेताशेतातून फवारली अथवा मुळांद्वारे दिली जातात. अशी विविध रासायनिक औषधे ही कॅन्सरला कारणीभूत ठरतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. परदेशी टूर, विविध गिफ्टस आदी अनेक प्रलोभने दाखवून रसायनांचा खप वाढविण्याच्या नादात आपण घराघरांतून कॅन्सर पेरणीचे पाप करतो आहोत याची तर अनेकांना जाणीव देखील नाही. एक दिवस 'बुमरॅंग' सारखे हे पाप म्हणजेच कॅन्सर तुमच्या घरात तुमच्या जीवलगाच्या किंवा अगदी तुमच्या शरीरातील पेशींना देखील 'कॅन्सर'ची बाधा होत लाखो रुपये खर्च, मानसिक मनस्ताप व नैराश्याच्या वादळांशी तसेच शारीरिक वेदनांनी झुंज करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
खजिना 'आव्हाने आणि संधीं’चाही गोष्ट अगदी खरी आहे कि शेती ही संधी आणि आव्हाने यांचा भरगच्च खजिना आहे. एका बाजूला वाढती लोकसंख्या, आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) सारखे तंत्रज्ञान वापरत अन्नसुरक्षिततेचे उद्दीष्ट गाठायचे आहे. दुसऱ्या बाजूला पारंपारीक बी-बियाणे व ते जतन करण्याची पद्धती मोडीत काढून आपण आपले 'हायब्रीडायझेशन' करून घेतले आहेत.
परदेशातील लोक आपल्या देशातील देशी बियाणे त्यांच्या देशात नेउन सकस अन्नधान्याची शेती ही दीर्घायू आणि कॅन्सर मुक्त जीवन जगण्यासाठी अवलंबत आहेत. दुसऱ्या बाजूला बाटलीबंद शीतपेये, पिझ्झा, बर्गर, पास्ता आणि रिफाईन ऑइल, जर्सी या जनावरांचे गाय नावाने विक्री होणारे दूध तसेच मैदा, सोयाबिन युक्त आणि कार्सिनोजेन्स पदार्थ आणि इतर हानिकारक रसायने आपल्या शरीरात सातत्याने पुरवत आहोत.
कार्सिनोजेन्स पदार्थ म्हणजे कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ होय. यात पिकांमधील अफलाटॉक्सिन, तळलेले आणि भाजलेले पदार्थांमधील ऍक्रिलामाइड आणि ग्रील्ड आणि जळलेल्या मांसामध्ये पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्स (PAHs) यांचा समावेश होतो. परीणामी आपण आपले स्वादुपिंड, जठर, यकृत, कीडनी आणि एकंदर पाचन व श्वसन तसेच मेंदूपर्यंत संवेदना पोहचविणारी मज्जारज्जू, चेतासंस्था आदींमध्ये व्यत्यय व बिघाड आणत लोकांचे स्वास्थ खराब होत वेदनादायी व अचानक अल्पायु मृत्यू होत आहेत.
कर्करोग मानव, प्राणी आणि अगदी वनस्पतींना प्रभावित करू शकतात, परंतु कर्करोगाचे प्रकार या गटांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. प्रत्येक श्रेणीतील कर्करोगाचे काही सामान्य प्रकार येथे आहेत:
मानवी कर्करोगस्तनाचा, गर्भाशयाचा, फुफ्फुसाचा, प्रोस्टेट, मुत्राशयाचा, कोलोरेक्टल (कोलन), त्वचेचा (मेलेनोमा), रक्ताचा, स्वादुपिंडाचा तसेच मेंदूचा कॅन्सर होत ब्रेन ट्यूमर हे मानवी कर्करोगाचे विविध प्रकार आहेत. प्राण्यांचे कर्करोगप्राण्यांमधील कर्करोगात देखील मानवाप्रमाणे वैविध्यपूर्णता आढळते. कुत्रे, मांजरी आणि घोड्यांसह विविध प्रजातींवर कॅन्सर परिणाम करतो. सामान्य प्राण्यांच्या कर्करोगांमध्ये कॅनाइन लिम्फोमा, फेलिन ल्युकेमिया, घोड्यांमध्ये सारकॉइड, कुत्र्यांमध्ये ऑस्टियोसारकोमा आणि हेमांगीओसारकोमा, तसेच कुत्रे आणि मांजरींमध्ये स्तन ग्रंथी ट्यूमर आदी विविध कॅन्सर व त्यामुळे इतरही आजारांचा समावेश होतो.
पक्ष्यांचे कर्करोगपक्ष्यांमध्ये पॅपिलोमॅटोसिस, एव्हीयन ल्युकोसिस हे कॅन्सर आढळतात. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व शिस्तबद्ध व दिनचर्येमुळे पक्ष्यांमध्ये कर्करोग कमी असावे. मात्र अनेकदा आकाशात उडत असल्याने पक्षांमधील कॅन्सरचे निदान होत नाही. मात्र, काही रिसर्च पेपरमध्ये याबाबत उल्लेख आढळतो. मात्र याबाबत अधिक संशोधन अभ्यास होणे आवश्यक आहे:
वनस्पती कर्करोगक्राउन गॅल (ऍग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स संसर्ग) हा वनस्पतीतील कर्करोग होय. वनस्पतींमध्ये असे रोग देखील होऊ शकतात ज्यामुळे असामान्य वाढ आणि ट्यूमर होतात. जरी हे प्राणी आणि मानवांप्रमाणेच कर्करोग मानले जात नाहीत. काही वनस्पती रोग ज्यामुळे असामान्य वाढ होते त्याला वनस्पतीतील कॅन्सर म्हणता येईल.
कॅन्सर टाळण्यासाठी हे उपाय शेतातून कॅन्सर पेरणी रोखणे : सुयोग्य प्रमाणा कृत्रिम कीटकनाशके आणि रसायनांशिवाय पिकवलेल्या सेंद्रीय उत्पादनाची निवड करीत पिकविलेले अन्नधान्य व फळफळावळ यांचा वापर आहारात करावा.
फळे आणि भाज्या धुलाई: कीटकनाशकांचे अवशेष काढून टाकण्यासाठी फळे आणि भाज्या पूर्णपणे धुवा आणि सोलून घ्याव्यात.
संतुलित आहार: कॅन्सरला कारणीभूत ठरणारी इंजेक्शन टोचून वाढ झालेली फळफळावळे, मांस टाळून, सुर्यास्तापुर्वी आणि सुर्योदयानंतर समतोल आहार घ्यावा. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य भरपूर प्रमाणात असणे, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
अन्न शिजविणे: उच्च-तापमानावर तळणे आणि जास्त-ग्रिलिंग टाळणे, स्वयंपाक करण्याच्या पद्धतींकडे लक्ष देत बदल घडणे शक्य आहे.
जीवशास्त्र आणि वर्तनाच्या दृष्टीने प्राणी आणि वनस्पतींमधील कर्करोग नेहमीच मानवी कर्करोगाच्या सारखे नसतात. तसेच त्यांचे वर्णन किंवा उपचार नेहमीच केले जाऊ शकत नाहीत हे सत्य आहे. नैसर्गिक वनात आणि मानवी वस्ती पासून दूर राहणाऱ्या पक्षी, वनस्पती व प्राण्यांमध्ये कर्करोग कमी आढळतो हे विशेष आहे. थोडक्यात प्राण्यांच्या कर्करोगासाठी देखील मानवी वर्तणूक कारणीभूत ठरते हे वास्तव आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने अन्न उत्पादनात हानिकारक कीटकनाशकांचा वापर मर्यादित करण्यासाठी नियम स्थापित केले आहेत आणि ते अन्न सुरक्षा मानके वाढवण्यासाठी कार्यरत आहेत. अन्न व औषध प्रशासन आपल्या मर्यादित मनुष्यबळासह कार्यवाही करीत भेसळ रोखत आपल्या शरीराला व समाजाला होणारा 'कॅन्सर' रोखण्यासाठी योगदान देत कृतीशील आहे. आपल्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करण्याची किंवा तो रोखण्याची जबाबदारी परग्रहवासी किंवा एलियन्सची आहे असे आपल्याला वाटते का? तसे असेल तर बिनधास्त 'कॅन्सर' शरीरात 'लोड' करा!
प्रा. किरणकुमार जोहरेके.टी.एच.एम. कॉलेज, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग, नाशिकमो. नं. 9168981939, 9970368009,kirankumarjohare2022@gmail.com