भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन दरवर्षी भारतात 'राष्ट्रीय शेतकरी दिन' २३ डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती.
त्यांच्या या योगदानासाठी सरकारने २००१ पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज राष्ट्रीय किसान दिन याच अनुषंगाने जाणून घेऊया देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्याविषयीची अधिक माहिती.
.. अन् सुरू झाला शेतकरी दिन
• २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० या कालावधीत भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंह यांनी अल्प कालावधीसाठी देशाची सेवा केली. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी भारतीय शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक धोरणे सुरू केली. ज्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो.
• चौधरी चरणसिंह यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध धोरणांनी भारतातील सर्व शेतकऱ्यांना जमीनदार आणि धनदांडग्यांच्या विरोधात एकत्र केले. यासोबतच पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या 'जय जवान जय किसान' या घोषणेचे त्यांनी पालन केले.
उत्तम लेखक
चौधरी चरण सिंह हे एक अतिशय अभ्यासू लेखक होते आणि त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. ज्यात शेतकरी आणि त्यांच्या समस्यांबद्दल विचार मांडले गेले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी विविध उपायांच्या स्वरूपात खूप प्रयत्न केले.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी
चौधरी चरण सिंह हे शेतकरी कुटुंबातील होते. त्यामुळे भारताचे माननीय पंतप्रधान असूनही त्यांनी अतिशय साधे जीवन जगले हेही विशेष.
कृषी संबंधित धोरणांमध्ये सुधारणा
• चौधरी चरण सिंह यांचे जीवन आणि कार्य शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणा ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विविध धोरणे तयार केली गेली. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली.
• त्यातील प्रमुख निर्णयांमध्ये जमीनदारी रद्द करणे, शेतकऱ्यांना वित्तीय मदत मिळवून देणे आणि कृषी संबंधित धोरणांमध्ये सुधारणा करणे यांचा समावेश होतो. त्यांच्या या योगदानामुळे भारतात शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात