आज २७ जून हा राष्ट्रीय कांदा दिवस (National Onion Day) म्हणून साजरा केला जातो. कांद्यातील विविध गुणांचे महत्त्व राखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने आपण कांद्याबद्दलच्या या काही खास गोष्टी माहीत करून घेऊ.
१. कांद्याचे मळ स्थान हे इराण आणि त्या शेजारचा प्रदेश आहे. भारतात पुरातन काळापासून याची लागवड होत आहे.
२.कांदा ही आवरणयुक्त कंद असलेली बहुवर्षायू वनस्पती आहे. सर्वच भागांना उग्र वास असल्यानेच कांद्याला संस्कृत भाषेत कंदर्पा असे म्हणतात.
३. जगात कांद्याच्या सुमारे २०० जाती आढळतात. भारतात लागवडीखाली असणार्या गर्द लाल, तांबडा कांदा आणि पांढरा कांदा अशा जाती आहेत.
४. कांदा मूत्रल, कफोत्सारक व आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारा) असतो.
५. हगवण, कावीळ, दमा, सांधेदुखी, जखमा इत्यादींवर तो गुणकारी ठऱतो, असा आयुर्वेदात उल्लेख आहे.
६. कांद्यामध्ये गंधक, साखर, कॅल्शियम, फॉस्फोरिक आम्ल, लिग्निन, अल्ब्युमीन आणि अ, ब, कगटातील जीवनसत्त्वे असतात. मात्र त्याचे सर्वसाधारण पोषणमूल्य कमी असते.
७.कांद्यात असलेल्या अलिल प्रोपिल डायसल्फाइड या बाष्पनशील गंधकयुक्त रसायनामुळे त्याला तिखटपणा प्राप्त झालेला असतो. त्यामुळेच कच्चा कांदा कापताना अगर खाताना डोळ्यात पाणी येते.
८.डोळ्याकरिता कांदा फार उपयुक्त आहे, असे जे सांगितले जाते त्याकरिता पेण-पनवेलकडचा विशिष्ट जातीचा पांढरा कांदाच वापरावा.
९. कांदा हा वृष्य किंवा शुक्रवर्धक म्हणून गणला जातो. त्याकरिता कांदे टोचावेत आणि भरपूर मधामध्ये किमान २ ते ३ आठवडे बुडवून ठेवावे. असा बुडवून ठेवलेला १ कांदा रोज खाल्ल्यास गमावलेले पौरुषत्व, ताकद पुन्हा मिळवता येते. डोळ्यात कांद्याचा रस टाकल्यास काही काळ झोंबते पण कफप्रधान चिकटा, घाण, धुरकट दिसणे या तक्रारी तात्पुरत्या कमी होतात.
१०. ज्यावेळेस अकारण एकदम ताप खूप वाढतो व रुग्ण तीव्र औषधे घ्यायला तयार नसतो अशावेळेस कांद्याचा रस तळहात, तळपाय, कानशिले, कपाळ याला चोळावे. तापाचे प्रमाण काही प्रमाणात कमी होते.