राजरत्न सिरसाट
अकोला : विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी शासनाने पुढाकार घेतला असून, यासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला ५ कोटी रुपयांचा प्रकल्प दिला आहे. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक(Natural) शेतीचे(Farming) धडे देणार आहे.
पिकावरील रासायनिक कीटकनाके, खतांचा अतिरेकी वापराचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. या अनुषंगाने शासन, शास्त्रज्ञ, सर्वत्र चिंता वाढली आहे. यावर उपाय म्हणून नैसर्गिक, सेंद्रीय शेती करण्यावर भर देण्यात येत आहे.
कृषी विद्यापीठाने गेली १० ते १५ वर्षांपासून या विषयावर काम केले आहे. सेंद्रीय शेती प्रमाणपत्र आणि आता फ्रान्सच्या संस्थेच्या सहकार्याने पदव्युत्तर सेंद्रीय शेती पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याचीच दखल घेत शासनाने या कृषी विद्यापीठावर नैसर्गिक शेती प्रसार व प्रशिक्षणाची जबाबदारी या प्रकल्पाच्या माध्यमातून सोपविली आहे.
कृषी विद्यापीठ काय करणार?
नैसर्गिक, सेंद्रीय शेती पद्धती व संशोधन करून शिफारस करणार, रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबवून सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपिकता आरोग्य वाढविण्यावर भर देणार, रसायनमुक्त सुरक्षित, सकस व पोषणयुक्त नैसर्गिक, सेंद्रीय शेतमाल उत्पादन करणे, मूल्यसाखळी विकसीत करणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन, नैसर्गिक शेती क्षेत्रात वाढ करणे, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्याच्या स्तरावर जैविक निविष्ठा केंद्र स्थापन करून स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा मातृकल्चर उपलब्ध करून देणे.''
शेतावर घेणार चाचण्या !
नैसर्गिक शेती करताना जैव निविष्ठाचा वापर करण्यात येणार आहे. घन जीवामृत, बिजामृत आणि जीवामृत या जैव निविष्ठाचा वापर याकरिता केला जाणार आहे. प्रत्येक महिन्यात ३० विद्यार्थी, शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नैसर्गिक शेती विस्तारासाठी शासनाकडून प्रकल्प मिळाला असून, काम सुरू करण्यात आले आहे. - डॉ. अनिता चोरे, विभागप्रमुख, कृषी विद्या,
डॉ. पं.दे.कृ.वि.अकोला