यवतमाळ : माती, पाणी, जातीवंत बियाणे, पीक नियोजन आणि श्रम ही नैसर्गिक शेतीची पंचसूत्रे असल्याचे सांगणाऱ्या आणि नैसर्गिक शेतीमध्ये सुपिकता वाढीचे मॉडेल (Model) विकसित केलेल्या यवतमाळ येथील सेंद्रिय शेतीचे (Oraganic Farming) पुरस्कर्ते सुभाष खेतूलाल शर्मा (Subhash Sharma) यांना पद्मश्री पुरस्कार (Padmashree Award) जाहीर झाला आहे. हा सन्मान (Honor) नैसर्गिक शेतीचा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
यवतमाळ शहरातील छोटी गुजरी येथे राहणाऱ्या सुभाष खेतूलाल शर्मा (७३) यांनी बी.कॉम. प्रथम वर्षपर्यंत शिक्षण घेतले. १९७५ पासून त्यांनी रासायनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला चांगले उत्पन्नही मिळाले. मात्र, काही वर्षांनंतर जमिनीची उत्पादकता वेगाने घसरत गेली आणि शेतीमध्ये त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्यानंतर १९९६ पासून त्यांनी नैसर्गिक शेतीला सुरुवात केली.
नैसर्गिक शेती (Natural farming) करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. संशोधन करत त्यांनी प्रत्येक समस्येवर मात केली. रासायनिक शेतीतून (Chemical farming) तोट्यात येत असलेल्या शेतकऱ्यांपुढे एक नवा मापदंड त्यांनी ठेवला.
नैसर्गिक शेती करताना वातावरणातील बदल (Climate Change), मातीची सुपिकता (Soil Fertility) आणि पाणी (Water) या तीन गोष्टींवर त्यांनी प्रभावीपणे काम केले.
शेती संशोधनातून उद्याची शेती कशी असावी, येणाऱ्या समस्या काय असतील, यावरच्या उपाययोजनासुद्धा सुभाष शर्मा यांनी शोधल्या आहेत.
शेतकऱ्याने एक एकर शेतीमागे एक जनावर पाळावे
* रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेती पद्धतीत मातीची सुपिकता जपण्यासोबतच पाणी टिकवून धरण्याची क्षमता अधिक आहे.
* शेतकऱ्याने एक एकर शेतीमागे एक जनावर पाळावे. या जनावराचे शेण, गोमुत्र याचा वापर शेतीत सातत्याने करावा. शेताच्या बांधावर वृक्षाची लागवड केल्याने पक्षी कीड नियंत्रण प्रभावीपणे करतात.
* कृत्रिम पक्षी थांबे उभारण्याऐवजी शेताच्या बांधावर स्थानिक वृक्षांची लागवड उत्पन्नासाठी करावी, असा त्यांचा नेहमी आग्रह असतो.
* मातीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीच्या खत पिकांच्या लागवडीसाठी मिश्र पीक पद्धतीवर ते भर देतात. याकरिता सहा किलो बोरू किंवा ढँचा, चार किलो बाजरी, सहा किलो बरबटी याप्रमाणे १६ किलो धान्याची लागवड करतात.
* हे वाढल्यानंतर रोटावेटरने ते जमिनीत गाढली जातात. या प्रयत्नातून मातीचा सेंद्रिय कर्ब ०.४ वरून २.१ वर आणणे शक्य झाल्याचे शर्मा यांनी सांगितले.
१९९६ पासून मी सेंद्रिय शेती करीत आहे. भविष्यातील शेती संकट लक्षात घेऊन सर्वच शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे, असे माझे मत आहे. आज शासनाच्या वतीने पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचे समजल्यानंतर मला मनस्वी आनंद झाला. सध्या विविध कारणांनी शेती आणि शेतकरी संकटात आहे. अशावेळी नैसर्गिक शेतीचा सन्मान होत असल्याने या पद्धतीचा येणाऱ्या काळात अधिकाधिक शेतकरी अवलंब करतील, असा विश्वास वाटतो. - सुभाष शर्मा, नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते
हे ही वाचा सविस्तर : Bajara Crop : शेतकऱ्यांनो उन्हाळी बाजरीचे तंत्र जाणून घ्या सविस्तर