यवतमाळ : माती, पाणी आणि पर्यावरणावर काम करणाऱ्या सुभाष शर्मा (Subhash Sharma) यांना राष्ट्रपतींच्या वतीने पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून शर्मा हे तिवसा येथे शेतीत विविध प्रयोग करीत आहेत.
नैसर्गिक शेतीच्या (Natural Farming) माध्यमातून शेती नफ्यात आणण्याचे तंत्र विकसित करीत आहेत. शर्मा यांनी दाखविलेली वाट शेतकऱ्यांसाठी आशादायी आहे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा (Former MP Dr. Vijay Darda) यांनी केले.
शेती क्षेत्रातील योगदानासाठी सुभाष शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार (Padmashree Award) नुकताच जाहीर झाला आहे. या अनुषंगाने डॉ. विजय दर्डा यांनी मंगळवारी तिवसा येथील शेतात शर्मा यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
शेतकऱ्यांनी (Farmer) स्वयंपूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी शेतीत पुन्हा माती, पाणी आणि पर्यावरण याच्या निर्मितीला बळ द्यावे लागेल, तिवसा येथे कुठलेही रासायनिक खत, कीटकनाशके आणि बाहेरचे बियाणे न वापरता शेती केल्याचे शर्मा यांनी सांगितले.
हा प्रयोग करून इतर शेतकरीही तोट्यातील शेती नफ्यात आणू शकतात, यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. नैसर्गिक शेतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी या पुरस्कारामुळे मोठे बळ मिळाल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगूळकर, माजी आमदार कीर्ती गांधी, जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, आनंदराव गावंडे, विलास देशपांडे, देवकिसन शर्मा, सुभाष यादव, सुनील यादव, जाफर खान, कैलास सुलभेवार, शंकरराव काजळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्याचे कौतुक
डॉ. विजय दर्डा यांनी सुभाष शर्मा यांच्या कार्याचे कौतुक केले. सुभाषजी यांचे पिताश्री खेतूलालजी शर्मा आणि माझे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी या दोघांचे अत्यंत जवळचे संबंध होते.
शर्मा यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक फुलविलेली ही शेती पाहून समाधान वाटले. हीच किमया इतर शेतकऱ्यांनाही साधता यावी, अशी शर्मा यांची तळमळ आहे. त्यांच्या या प्रयत्नांना निश्चित यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत शर्मा यांना जाहीर झालेला पुरस्कार हा या मातीचा, जिल्ह्याचा सन्मान असल्याचे गौरवोदगार डॉ. दर्डा यांनी काढले.