वाशिम जिल्ह्यात विविध पिकांच्या लागवडीखाली ४ लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन आहे. त्यातील सुमारे १७ हजार एकरवर नैसर्गिक पद्धतीची शेती केली जात असून, दर्जेदार शेतमाल पिकवला जात आहे.
जिल्ह्यात १४० शेतकरी गटातील ७ हजार शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरल्याची माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक अनिसा महाबळे
यांनी दिली.
शेतातून झटपट पीक काढून पैसा कमविण्याच्या हव्यासापायी सेंद्रिय शेती पद्धत लयास जाऊन रासायनिक शेतीला सर्वाधिक प्रोत्साहन मिळाले. त्याचे विविध स्वरूपातील दुष्परिणाम सध्या सर्वांनाच भोगावे लागत आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे महाबळे यांनी सांगितले.
जिल्ह्यात नैसर्गिक शेतीचे प्रमाण वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्याला शेतकऱ्यांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १४० शेतकरी गटांमधील ७ हजार शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळले असून, १७ हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्र नैसर्गिक पद्धतीने पिकविण्यात येणाऱ्या पिकांखाली आले आहे. - अनिसा महाबळे, प्रकल्प संचालक, 'आत्मा'
जाणून घ्या, नैसर्गिक शेतीचे फायदे
• विषमुक्त अन्न उत्पादित होते.
• रासायनिक खतांवरील अवलंबन कमी होते.
• कीटकनाशक फवारणीमुळे होणारे दुष्परिणाम, खर्च नाही.
• बियाणे घरचेच असल्याने शेतकरी स्वावलंबी बनतो.
• शेतजमिनीमध्ये मित्रकीटक वाढतात.
• जमिनीचा पोत सुधारून उत्पादनात वाढ होते.
दर्जेदार उत्पादनासाठी भर हवा !
रासायनिक खताच्या अती वापराने शेतातील काळी कसदार माती दर्जाहिन झाली आहे. त्याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर होत आहे. भविष्यात शेती टिकवायची असेल, तर सेंद्रिय शेतीची कास धरण्याशिवाय पर्याय नाही. शेतात रासायनिक खताला शेणखत, गांडूळ खत, हिरवळीचे खत सक्षम पर्याय ठरतो, या पारंपरिक खतांमुळे जमिनीचा पोत टिकून राहतोचः शिवाय लागवड खर्चही कमी करता येणे शक्य आहे.