विशाल सोनटक्के
यवतमाळ : विज्ञान समजून घेतले नाही म्हणून शेतकऱ्यांना (Farmer) शेतीशास्त्र समजले नाही. त्यामुळेच आज शेतीसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ५५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा गेला आहे. पुढील काही वर्षात आणखी उद्रेक होऊन सजीवांचे अस्तित्वच धोक्यात येईल.
यापासून वाचायचे असेल तर आपल्याला पुन्हा माती, पाणी आणि पर्यावरणाच्या उत्पादनाकडे वळावे लागेल हे उत्पादन नैसर्गिक शेतीतून शेतकरी करू शकतो. अशी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने थेट आर्थिक लाभ द्यावा.
त्यासाठी उपभोग घेणाऱ्या समाजावर टॅक्स (Tax) बसविला पाहिजे. या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांसोबत समाज जोडला जाईल, असे मत पद्मश्री सुभाष शर्मा (Padmashree Subhash Sharma) यांनी व्यक्त केले.
सृष्टीची निर्मिती कशी झाली हे लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला शेतीशास्त्र (Agriculture) समजेल, असे ते म्हणाले. पूर्वी दोन टक्के क्षेत्रात पशुपालन होत होते. तीन टक्के क्षेत्रात जलसंधारण, ३० टक्के क्षेत्रात झाडे, तर ६५ टक्के क्षेत्रात शेती, असे शेतकऱ्याचे गणित होते. ही व्यवस्था मागील काही वर्षांत कोलमडून गेली.
पर्यायाने शेतकऱ्याला बाजारपेठेकडे वळावे लागले. त्यातून रासायनिक खते, बी-बियाणे यांचा मारा सुरू झाला. खरे तर शेतीसाठी बाहेरून काहीही खरेदी करण्याची आवश्यकता नाही.
सद्यस्थितीत वातावरणातील बदल (Climate Change), मातीची सुपीकता, पाण्याचे दुर्भिक्ष्य, पर्यावरणाचे असंतुलन (Environmental Imbalance) आणि उत्पादनाची किंमत (Product Price) या पाच प्रमुख समस्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर आहेत.
* आज देशातील ८० टक्के क्षेत्र डार्क झोनमध्ये गेले आहे. मग अब्जावधी रुपये खर्चून उभारलेली मोठी धरणे काय कामाची, असा प्रश्न करीत माती, पाणी आणि पर्यावरणाचं आपल्याला पुन्हा उत्पादन घ्यावे लागेल.
* हे उत्पादन नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकरी घेऊ शकतो. या तीनही उत्पादनांचा उपभोग समाज घेतो, परतफेड म्हणून समाजाने टॅक्सच्या रूपात त्याची किंमत चुकविली पाहिजे.
* टॅक्समधून मिळणाऱ्या निधीची रक्कम नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकावी. म्हणजे, हा मोबदला आणि शेतीतील उत्पन्न शेतकऱ्याला स्थैर्य देईल.
झाडे लावणाऱ्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट (Carbon Credit) म्हणून मोबदला द्या, म्हणजे तो शेतीत राबेल, या प्रकारे समाजाबरोबर शेती आणि शेतकरी जोडला तर शेतीलाही प्रतिष्ठा प्राप्त होऊन शेती आणि शेतकऱ्यांबरोबरच समाजासमोरील संकटात आलेल्या पर्यावरणाच्या प्रश्नावर आपण मात करू शकू.
नैसर्गिक शेतीतून १०० टक्के आरोग्याची गॅरंटी, पाणी आणि अन्न सुरक्षितता मिळते. यवतमाळ येथे केलेल्या शेतीच्या प्रयोगातून मी हे सिद्ध केले आहे. याच पद्धतीने आपण नैसर्गिक शेतीकडे वळलो, तर उद्या समाजावर पाण्यासाठी झगडण्याची, श्वासासाठी ऑक्सिजन (oxygen) खरेदी करण्याची वेळ येणार नाही, असे परखड मतही पद्मश्री सुभाष शर्मा यांनी मांडले.
तर सजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल
रासायनिक खत वापरणे, पिकावर विष मारणे ही शेती नव्हे. आपण निसर्ग नियमाच्या विरूद्ध शेती करीत आहोत. जोपर्यंत शेतीमध्ये परस्परपूरकता येत नाही तोपर्यंत ती शेतीच नव्हे. सध्या आहे ती केवळ व्यापार व्यवस्था. मग यात शेतकरी जगला काय, अन् मेला काय, व्यापाऱ्याला काहीही देणे-घेणे नाही.
भविष्यासाठी ही व्यवस्था मोठी घातक आहे. आपण तातडीने सुधारणा केल्या नाहीत तर पुढील काही वर्षात सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशाराही शर्मा यांनी दिला.