Join us

नाशिक जिल्हा बँक जप्ती: आंदोलक शेतकरी घेणार मंत्रालयावरून उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 5:25 PM

शासन दखल घेत नसल्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून कुठल्याही क्षणी उड्या मारण्याचे आंदोलन करण्याचा इशारा नाशिक जिल्हा बँक (NDCC Bank) वसुली पीडित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दिला आहे. 

एका बाजूला यंदा कमी पडलेला पाऊस, दुसऱ्या बाजूला कांदा-टोमॅटो अशा पिकांना मिळणारा मातीमोल दर अशा कोंडीत बळीराजा सापडलेला असतानाच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कर्जदार शेतकऱ्यांना जमीन जप्तीच्या नोटीसा बजावण्यात येत आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांचे १०३ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून अजूनही शासन दखल घेत नसल्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून कुठल्याही क्षणी उड्या मारण्याचे आंदोलन करण्याचा इशारा नाशिक जिल्हा बँक वसुली पीडित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दिला आहे. मागचे तीन चार वर्षे अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकऱ्याची आर्थिक स्थिती खालावली असून ते कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे ५३ हजार शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बॅंकेच्या वतीने अशा नोटीसा आल्या आहेत. ही कारवाई टाळण्यासाठी शेतकरी  १०३ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. दरम्यान आज ११ सप्टेंबर रोजी नाशिकच्या  मुंबई नाका पोलिसांनी आंदोलकांची बैठक बोलावून टोकाचा निर्णय न घेण्याबाबत नोटीस बजावली. मात्र आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींनी आंदोलन स्थळी येऊन याबाबत उपस्थित शेतकऱ्यांची सविस्तर चर्चा करण्यात केली तेव्हा शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले. 

नाशिक जिल्ह्यातील सुमारे 53 हजार शेतकऱ्यांपैकी कोणीही शेतकरी शासनाने ‘आमचा प्रश्न येत्या दहा दिवसात न सोडवल्यास मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उड्या घेऊन शासनाचा निषेध करतील’, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळक्ष शेतकरी संघर्ष संघटना व शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे व जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे उच्चाधिकर समिती सदस्य दिलीप पाटील धोंडीराम थैल व समिती सदस्य रामराव मोरे उपस्थित होते.  यावेळी शासनाशी चर्चा करण्यासाठी पाच लोकांची स्वतंत्र कमिटी स्थापन करण्यात आली. त्यात सुधाकर मोगल भगवान बोराडे कैलास बोरसे दिलीप पाटील व धोंडीराम थैल यांचा समावेश करण्यात आला. तसेच  एक उप समिती नेमून त्यात मांगू कापडणीस, खेमराज कोर, दगाजी अहिरे, रामराव मोरे, प्रभाकर थोरात, विश्राम कामाले चींधू पगार , मच्छिंद्र जाधव, संतोष पाटील, अक्षय आहेर, जयराम बहिरम , जितू पवार, देवा वाघ, बापू जाधव, नंदू देवरे, दीपक निकम ही समन्वय समिती कायम करण्यात आली. यावेळी जयराम मोरे,  सुनील पवार, सरपंच दात्याने,  खंडेराव मोगरे, गंगाधर शिंदे, भारत गाडेकर, सोमनाथ सहने यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :शेतकरी आंदोलनआंदोलनमंत्रालयपीक कर्ज