Join us

म्हणून शेतकऱ्यांनी केली ‘कर्जमुक्ती गणेशा’ची स्थापना, वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 4:26 PM

गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यातील गणेशभक्तांनी विघ्नहर्ता गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली. सुमारे शंभराहून अधिक दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनीही आंदोलनस्थळीच गणेशाची स्थापना केली आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज थकवलेल्या सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांच्या जमीन जप्तीची मोहीम सुरू केली आहे. त्या विरोधात शेतकरी मागच्या शंभर दिवसांपासून धरणे आंदोलन करत आहेत. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासमोरील फुटपाथवर दि. १ जून २३ रोजी सुरू झालेले शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन आजतागायत सुरू असून शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. आतापर्यंत विविध राजकीय नेत्यांसह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना अर्ज विनंत्या करून शेतकरी थकले आहेत. म्हणून त्यांनी शेवटी विघ्न निवारण करणाऱ्या गणरायालाच साकडे घालण्याचे ठरवले आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी रस्त्यावर उभारलेल्या आंदोलनाच्या मंडपातच गणेशाची स्थापना केली.

‘या गणपतीला आम्ही कर्जमुक्ती गणपती असे नाव दिलेय. जिल्हा बँकेने सुरू केलेली कर्जवसुलीची मोहीम शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. हजारो शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन या कारवाईत जप्त होण्याची शक्यता आहे. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आहोत, त्यालाही आता १०० दिवस होऊन गेले, पण आमचा प्रश्न अजूनही कायमा आहे. म्हणून आम्ही शेवटी विघ्नहरण करणाऱ्या गणेशाची स्थापना करायचे ठरवले. गणरायाच्या कृपेने आमचा प्रश्न सुटण्याची आम्हाला आशा आहे.’ कर्जमुक्ती गणेशाच्या स्थापनेचं कारण भगवानराव बोराडे सांगत होते.

विविध कारणांनी नाशिक जिल्हा सहकारी बँक अडचणीत आल्याने आणि रिझर्व बँकेने विहित केल्यानुसार ९ टक्के भांडवल २०१७ ते मार्च २१पर्यंत (सीआरएआर) राखू शकली नसल्याने या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यानंतर रिझर्व बँकेने लादलेले निर्बंध दूर करण्यासाठी व परिस्थिती सुधारण्यासाठी बँकेच्या वतीने कर्जवसुलीची धडक मोहीम सुरू करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्ज वसुलीसाठी जून महिन्यापासून नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने थेट जमिनींच्या जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यातील सुमारे  ३३ हजार कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनींवर जप्तीची कारवाई सुरू झाली, तर सुमारे २० हजार शेतकऱ्यांना १ वर्षाच्या मुदतीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट आंदोलनाचा पावित्रा घेतला. शेतकरी संघर्ष संघटनेच्या समन्वय समितीच्या माध्यमातून १ जूनपासून नाशिकमध्ये धरणे आंदोलनाची सुरूवात झाली. आंदोलनादरम्यान मोर्चा काढणे, निवेदने देणे आणि उपोषण करणे या पर्यायांचा शेतकरी प्रतिनिधींनी अवलंब केला. मात्र आजही हा प्रश्न सुटलेला नसून हे सर्व कर्जदार शेतकरी जमीन जप्ती कारवाईच्या दडपणाखाली आजही वावरत आहेत. मात्र हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवानराव बोराडे यांनी सांगितले की नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तत्कालिन संचालकांनी शेतकरी नसलेल्यांना अव्वाच्या सव्वा कर्जे दिली. ती थकबाकी १८२ कोटींवर पोहोचली. याशिवाय नोटबंदीच्या काळात जिल्हा बँकेकडे पडून असलेले सुमारे साडेतीनशे कोटी रुपये आजही बँकेला बदलून घेता आलेले नाही. बड्या लोकांना दिलेले कर्ज आणि पडून राहिलेले ३५० कोटी रुपये यांची एकत्रित रक्कम पाचशे कोटींवर जाते. ही रक्कम बँकेवरील निर्बंध हटविण्यासाठी पुरेशी आहे, मात्र बड्या लोकांना अभय देत बँक सामान्य कर्जदार शेतकऱ्यांच्या विरोधात थेट जमीन जप्तीची मोहीम राबवित आहे.

कर्जदार शेतकऱ्यांनी सुरूवातीलाच जिल्हा बँकेच्या प्रशासकांना एक प्रस्ताव दिला होता. त्यानुसार थकीत कर्ज असलेले सुमारे पंचावन्न हजार शेतकरी दहा ते पंधरा हजारांची रक्कम बँकेत भरतील. त्यातून जिल्हा बँकेच्या खात्यात सुमारे ५५ ते ६० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असती. पण बँकेच्या प्रशासकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे कर्जदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान गणेशोत्सवाच्या काळातही आंदोलन सुरूच असून आंदोलनस्थळी प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीमूर्तीची याठिकाणी रोज सकाळ-संध्याकाळ पूजा होत आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या विविध गावांतून शेतकरी उपस्थिती लावताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ‘गणपती बाप्पा मोरया’ बरोबरच ‘आंदोलनाच्याही घोषणा’ इथं दिल्या जात आहेत.

टॅग्स :शेतकरी आंदोलनबँकनाशिकशेतकरी