Join us

...जेव्हा वसुली अधिकाऱ्यांची गाढवावरून शेतकऱ्यांनी काढली होती धिंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 1:06 PM

प्रासंगिक: नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जमीन जप्तीच्या कारवाईत जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावाच्या उंबरठ्यावर आहेत. त्याविरोधात शेतकरी १ जूनपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनाच्या रेट्यामुळे प्रत्यक्ष जप्तीची कारवाई सध्या थांबली आहे. काही वर्षांपूर्वी अशाच जप्ती मोहीमेविरोधात शेतकरी एकवटले होते, त्याच्या आठवणी..

हे वाचताना आज अतिशयोक्ती वाटेलही; पण  एक काळ असा होता की सक्तीची वसुली करताना बँकेचे वसुली अधिकारी शेतकऱ्यांचा त्याच्या बायको, मुलीच्या नावाने अपमानास्पद आणि घृणास्पद बोलून उपमर्द करायचे. शरद जोशींनी इतिहासात पहिल्यांदाच १९८० च्या दशकात ‘कर्जवसुली अधिकाऱ्यांविरोधात गावबंदी’ जाहीर केली आणि शेतकरीपुत्रांनी गावागावात या जुलमी वसुलीचा, प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाऊन व तुरुंगाची हवा खाऊन या प्रकाराचा प्रतिकार केला.

बँकांची सक्तीची कर्जवसुली हा प्रकार तर १९९५२पर्यंत सुरू होता. एखाद्या शेतकऱ्यावर एखाद्या बँकेचे -जर ५० हजार रुपये कर्ज असेल, तर वसुली अधिकारी त्या शेतकऱ्याच्या घरात घुसून त्याच्या घरातली स्वयंपाकाची भांडी जप्त करायचे, झोपायचा पलंग जप्त करायचे, घरात असलेले पाचपन्नास किलो अन्नधान्य जप्त करायचे. या वस्तूंची एकूण किंमत दोन-चारशेच असायची. पण या वस्तू जप्त करून, त्याचे चावडीवर प्रदर्शन मांडून त्या शेतकऱ्याची पुरेपूर नाचक्की करणे, हा त्यामागचा हेतू असायचा. सक्तीच्या वसुलीने आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढून त्यांना समाजात अपमानित केले  होते. अनेकांनी तर या अपमानाच्या धास्तीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते.

वायदाबंदीमुळे शेतकऱ्यांनी तलाठ्यास कोंडले तो क्षण.

स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजानी शेतकऱ्यांचा जमिनी शेतसारा न भरल्यामुळे जप्त केल्या होत्या त्याविरोधात गांधीजींनी आंदोलनाचे हत्यार उपसत चंपारण्यातील शेतकऱ्यांचा समर्थनात सत्याग्रह केला आणि सक्तीचा वसुलीचा बंदोबस्त केला. स्वातंत्र्यानंतर इंग्रज गेले पण व्यवस्था शेतकऱ्यांचा शोषणावरच कायम उभी ठाकली. शेतकऱ्यांना सक्तीची लेव्ही लावत बेकायदेशीररित्या सक्तीचा वसुलीने शेतजमीन लिलाव व्हायला लागले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शरद जोशीचा नेतृत्वात या जुलमी वसुलीचा शेतकरीपुत्रांनी प्रतिकार केला. त्यांच्या रुपाने निळ्या पॅन्टमधला गांधी शेतकऱ्यांचा योद्धा बनला.

असा झाला सरकारी ठगांचा बंदोबस्तदि.१८नोव्हेंबर १९९४ कळगाव ता. उमरी. तो काळच धामधूमीचा होता. एका बाजूला सरकारने राबवलेल्या अनेकानेक शेतकरीविरोधी कायद्यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडून त्यांना देशोधडीला लावले होते.

दुसऱ्या बाजूला सरकारी ठगांनीही यात कसलीच कसर कमी पडू दिली नाही. शेतकऱ्यांचा बेकायदेशीररित्या वसुलीने केलेला छळ आता चव्हाट्यावर आला होता. शरद जोशींनी सुरू केलेल्या पुढारी आणि वसूली अधिकाऱ्यांचा गावाबंदीने आता महाराष्ट्र पेटला होता. गावाबंदीचे लोन आता मराठवाड्यातील कामनगावातही धडकले होते.

कळगावातील शेतकरी तुकाराम केवळा चव्हाण याने पंढरपूरात विठुरायाचा दर्शन घेऊन गावी सहकुटुंब परतला होता. गावात वसूली अधिकाऱ्यांनी बेकायदा वसुलीला सुरुवात केली होती. शेतकऱ्यांनी वसुलीच्या धास्तीने कुणी बकरं तर कुणी कोंबड, कुणी दारू तर कुणी गळ्यातील कुडकां-मुडकां दागिना देऊन तात्पुरती वसुली थांबवत होत. अगोदरच यात्रेला जाऊन पैशाने नागोळ होऊन आलेल्या तुकारामाजवळ फुटकी कवडीही नव्हती. ठरल्याप्रमाणे वसुली अधिकारी तुकाराम केवळा चव्हाण यांच्या घरी आले आणि जे मिळेल ते काढून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्याजवळ काहीच मिळाले नाही.  

म्हणून मग बघता बघता वसूली अधिकाऱ्यांनी तुकारामाचा घरातील सर्व सामान बाहेर काढायला लावले. त्यात पलंग, घरावरील पत्रे, संसारउपयोगी वस्तू, भांडे-कुंडे रस्त्यावर काढून त्यांचा इज्जतीचे लचके तोडू लागले. गावातही शेतकरी संघटनेचे बरेच कार्यकर्ते होते. प्रशासनाच्या ताकतीपुढे कोणाचेही काहीही चालत नव्हते. कार्यकर्त्यांनी पाच किलोमीटर अंतरावर असलेला संघटनेचा बालेकिल्ला कामनगावात जाऊन सुरेशराव देशमुखांना झालेली हकीकत सांगितली. झालेल्या प्रकाराने सुरेशराव देशमुख आणि गावातील मूठभर कार्यकर्त्यानी कळगावचा दिशेने पायानेच मोर्चा वळवला.

असा शिकवला धडाकामनगावातील संघटनेचे कार्यकर्ते कळगावला येणार या धास्तीने वसुली अधिकाऱ्यांनीही उमरी पोलीस प्रशासनाची मदत बोलावून घेतली. कामनगावचा पित्त खवळलेल्या आंदोलकांनी कळगावला जाताना हाडोळीतील कुंभाराची गाढवं नेलीत. आता काही क्षणात प्रशासनाची आणि आंदोलनाचा पवित्र्यात असलेल्या कार्यकर्त्यांशी आमने सामने गाठ पडणार होती. वेळ झाली सर्वांची अमोरासमोर झाली. रस्त्यावर टाकलेला शेतकऱ्यांचा उभा संसार बघून देशमुख संतापले आणि जो जो आमचा आड येईल, त्या त्या सर्वांनाच गाढवावर बसून धिंड काढण्याचे आव्हान दिले.

चवताळलेल्या आंदोलकांच्या धास्तीने पोलीस प्रशासन माघारी परतले आणि वसूली अधिकारी मात्र चांगलेच गावले. आंदोलनकर्त्यांनी चपलांची माळ घालून सर्व वसूली अधिकाऱ्यांना आळीपाळीने गाढवावर बसून कळगाव, हाडोळी आणि कामनगावातून धिंड काढून त्या निर्दयी, क्रूर सक्तीचा बेकायदा वसुलीला लगाम लावला.

पुढे काही दिवसांनी संघटनेचे दुसरे धडाडीचे सहकारी हणमंतराव पाटलांचा नेतृत्वात लामकानी येथे सुद्धा वसूली अधिकाऱ्यांची गाढवावर बसून धिंड काढली गेली. सरकार आणि सरकारी ठगांचा मनात आता संघटनेचा नावाचं काहूर शिरलं होत. जीवाचा, अब्रूचा आकांताने वसूली अधिकारी आता गावागावात जाऊन सक्तीची वसूली करण्यासाठी घाबरू लागले होते. पण भुविकास बँकेने आपला पावित्रा बदलला होता. गावात जाऊन सक्तीची वसूली करण्यापेक्षा शहरांतच शेतजमीन लिलाव करून शेतकऱ्यांचा जमिनी बळकावण्याचे अभियान जोरात सुरू झाले.

हेही वाचा : Agro Special : शेतकऱ्यांनी कर्ज काढलं टॅक्टरसाठी आणि जप्त होत आहेत शेतजमिनी

आणि शेतजमीन लिलाव हद्दपारवरील घटनेनंतर बरोबर पंधरा दिवसांनी भुविकास बँकेने उमरी येथे १०१ शेतकऱ्यांचा जमिनीचे जाहीर लिलाव ठेवले. त्या दिवशी शरद जोशींची बिलोलीत सभा होती. गावातील बहुतांश कार्यकर्ते अगोदरच सभेला पोहचले होते. सुरेशराव देशमुख सभेला निघण्याचा तयारीत असताना १०१ शेतकऱ्यापैकी बेंबर येथील एका शेतकऱ्याने (ज्यांना जंगमाचे महाराज म्हणून ओळखले जाते )  देशमुखांना गाठले. घडला प्रकार सांगितला. सुरेशराव देशमुख आणि काही कार्यकर्त्यांनी बिलोलीची सभा न करता भूविकास बँक गाठली.

बँकेत जाताच आग्या मोहोळ उठावा तसे कार्यकर्ते अधिकाऱ्यावर तुटून पडले. देशमुखांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावायला सांगत वरिष्ठांना कळगावातील ताज्या प्रकरणाचा दाखला दिला. अगोदरचा भयग्रस्त असलेले अधिकारी,त्यावर अचानक झालेला हल्ला त्यांना समजण्यापलीकडे होता. शेतकरी नेत्यांनी शेतजमीन लिलाव कायमचा रद्दची जी मागणी केली ती त्यांच्याकडून अधिकृत लिहून घेत शेतजमीन लिलावांना हद्दपार करून टाकले. कामनगावातील लहान थोरांनी, बायका पोरांनी, तालुक्यातील बहुतांश गावांनी घेतलेल्या आंदोलनाचा आक्रमक पवित्र्यांनी सक्तीची वसूली आणि शेतजमीन लिलाव देवीचा रोगासारखे कायमचे बंद झाले. 

- संदीप देशमुख, कामनगांवकर(लेखक कृषी अभ्यासक आहेत.)

टॅग्स :शेतकरी आंदोलनशेतकरीशेतकरी आत्महत्या