महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पडणाऱ्या पावसातील अनियमितता वाढत चालली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची लागवड नेमकी कधी करायची, त्यासाठी उलटलेल्या कालावधीनुसार लागवडीसाठी कोणती पिके निवडायची याविषयी शेतकरी बांधवांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण होत आहे.
आपत्कालीन पीक नियोजनांतर्गत कृषि विद्यापीठाने उशिरा सुरू होणाऱ्या पावसानुसार कुठली पिके घ्यावीत हे सांगितले असले, तरी आता खरा प्रश्न आहे पावसाच्या सातत्याचा, वेळेवर किंवा उशिरा सुरू झालेल्या पावसात पुढे सातत्य दिसून येतच नाही. मोठ्या खंडाबरोबर तो पडतो एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे पिकास त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होताना बहुतेक वेळा दिसून येते. अशा वेळी प्रसंगी पावसाच्या वेगवेगळ्या परिस्थितीत पिकांसाठी शेतकरी बांधवांनी नेमकं काय करावं याविषयी विद्यापीठाकडून तसेच कृषी खात्यामार्फत टिप्पणी दिली गेली तर त्याचा निश्चित फायदा होईल.
जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध परिस्थितीत चांगले उत्पादन देणाऱ्या वाणांची निर्मिती होणे अतिशय गरजेचे आहे. यामध्ये केवळ कमी पावसाच्या पाण्यावर चांगले उत्पादन देणाऱ्या वाणांबरोबरच जास्त पावसाच्या परिस्थितीतही तग धरणारे पिकांचे वाण विकसित होणे गरजेचे आहे . कृषि संशोधकांपुढे हे खूप मोठे आव्हान आहे परंतु ते त्यांनी स्वीकारले पाहिजे. त्यासाठी बदलत्या परिस्थितीत केवळ अन्नसुरक्षाच नाही तर शेतकरी सुरक्षेसाठी एक नाही तर अनेक स्वामीनाथन निर्माण व्हायला पाहिजेत.
विद्यापीठ व इतर कृषिसंलग्न संस्थांमध्ये विकसित झालेल्या वाणांची तसेच तंत्रज्ञानाची माहिती प्रभावीपणे शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवणेही वाण व तंत्रज्ञान विकसना एवढेच महत्त्वाचे आहे. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीसाठी विकसित केलेल्या वाणांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करून प्रात्यक्षिकांद्वारे प्रत्यक्ष शेतकरी बांधवाच्या शेतावर भरघोस उत्पादन काढून दाखवायच्या योजनाही मोठ्या प्रमाणात राबवल्या गेल्या पाहिजेत. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीसाठी विकसित केले गेलेल्या कृषि तंत्रज्ञानाच्या बाबतीतही असेच अनेक प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून त्याची सत्यता तपासली गेली पाहिजे. कृषि विद्यापीठे, अन्य कृषि संशोधन संस्था, तंत्रज्ञान प्रसार करणारा राज्य शासनाचा कृषि विभाग यांनी शेतकरी हिताचा विचार करून वरील कार्य गांभीर्याने केले तर खरोखरीच शेतकरी बांधवाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणे शक्य होणार आहे.
-डॉ. कल्याण देवळाणकर, कृषीतज्ज्ञ