अयोध्याप्रसाद गावकर
देवगड हापूस आंबा कलमांना मोहर येण्याच्या वेळेलाच म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ७० टक्के आंबा कलमांना पालवी आली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये मोहर येण्याच्याच वेळेला आंबा कलमांना बहारदार अशी पालवी येत आहे. यामुळे हापूस आंब्याचा मोसम एक महिना उशिरा येऊन उत्पादनात घट होते. चैत्र महिन्यात येणारी पालवी नोव्हेंबर महिन्यातच का येते याचे संशोधन होणे गरजेचे आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांचा इतिहास पाहता ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये आंबा कलमांना पहिल्या टप्प्यातील मोहर येण्याच्याच वेळेला ७० ते ८० टक्के पालवी येत आहे. या वर्षीही ७० टक्के आंबा कलमांना बहारदार अशी पालवी आली आहे. चैत्र महिन्यामधील गेल्या काही वर्षांमधील आंबा कलमांना पालवी येत नसल्यामुळेच नोव्हेंबर महिन्यामध्ये ही पालवी येत आहे. आंबा कलमांना चैत्र महिन्यामध्ये पालवी येण्याचे संतुलन बिघडल्यामुळेच मोहर येण्याच्याच वेळेला आंबा कलमांना यामुळे पालवी येत आहे. चैत्र महिन्यामध्ये आंबा कलमांना पालवी आली की ती पालवी परिपक्व होऊन नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये आंबा कलमांना मोहर येत असतो. हे संतुलन बिघडल्यामुळेच आंबा कलमांना मोहर येण्याऐवजी सध्या पालवी येत आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन संशोधन करणे गरजेचे आहे.
अधिक वाचा: पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेसाठी कसा कराल अर्ज?
बदलत्या वातावरणामध्ये आंबा पीक टिकविणे ही बागायतदारांसमोर फार मोठी कसोटी निर्माण झाली आहे. तरीदेखील येथील शेतकरी पावसाळ्यामध्ये आलेल्या मोहराचे संरक्षण करून आंबा पीक घेत आहेत. सध्या देवगड तालुक्यामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देवगड हापूस आंबा कलमांना ७० टक्के पालवी आल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीला १० टक्के आंबा कलमांना मोहर आला आहे. तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला १५ टक्के आंबा कलमांना मोहर येत असल्याचे दिसून येत आहे.
देवगड तालुक्यात ७० टक्के कलमांना पालवी
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मोहर येण्यास सुरुवात होते. डिसेंबर महिन्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मोहर येण्यास सुरुवात होते, तर जानेवारी महिन्यामध्ये तिसऱ्या टप्यातील व फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील आंबा कलमांना मोहर येत असतो. सध्या देवगड तालुक्यात ७० टक्के कलमांना पालवी आली आहे. ही पालवी परिपक्व होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पालवी आलेल्या कलमांना मोहर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अवकाळीची शक्यता
या वर्षी देवगड तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अवकाळी पाऊस वारंवार पडण्याची शक्यतादेखील बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. यामुळे या वर्षी अवकाळी पावसालादेखील आंबा बागायतदारांना सामोरे जावे लागणार, असा अंदाज बागायतदारांमधून वर्तविण्यात येत आहे.