निशांत वानखेडे
वनस्पती शास्त्रातील संशोधनात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. 'क्लिस्टॅन्थस' प्रकारातील एका नव्या प्रजातीच्या वनस्पतीचा शोध विदर्भातील तीन वनस्पती संशोधकांनी लावला आहे.
या वनस्पतीची जगात कुठेच नोंद नसून केवळ भंडारा जिल्ह्यात आढळल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या वनस्पतीचे फळ हे विषारी असून ते नैसर्गिक किटकनाशक म्हणून काम करू शकते.
जगामध्ये क्लिस्टॅन्थस या जिनसच्या १३४ प्रकारच्या वनस्पती असून दीक्षाभूमियाना हा १३४ वा प्रकार ठरला आहे. भारतात या प्रकारात ८ प्रजातीच्या वनस्पती आहेत व भारतातच केवळ ५ आढळतात.
नव्याने शोधलेली ही ६ वी प्रजाती आहे. या संशोधनाची दखल भारत सरकारच्या 'इंडियन फॉरेस्टर'ने घेतली असून १७८ व्या मासिकाच्या ८ व्या अंकात वनस्पतीची नोंद करण्यात आली आहे.
यांनी केले संशोधन
वनस्पतीचे फळ स्तूपाच्या आकाराचे असल्याने त्यांनी 'क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना' असे नामकरण केले आहे. डॉ. अलका चतुर्वेदी, डॉ. सुभाष सोमकुंवर व डॉ. जगन्नाथ गडपायले या वनस्पती अभ्यासकांनी भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या अंबागड जंगलातून ही वनस्पती शोधली आहे.
नैसर्गिक कीटकनाशक म्हणून होऊ शकतो वापर
गराडीची फळे विषारी असतात, त्याप्रमाणे या वनस्पतीची फळेसुद्धा विषारी असतात. प्राणीसुद्धा ती खात नसावे, असा अंदाज डॉ. सुभाष सोमकुवर यांनी व्यक्त केला. या वनस्पतीचे रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करीत असून नैसर्गिक पेस्टीसाईड म्हणून वापर होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला.
'क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना'ची वैशिष्ट्ये
* फळाचा आकार बौद्ध स्तूपाच्या डोम सारखा असतो. त्यावरून दीक्षाभूमियाना' असे नाव दिले. ही गराड़ी समूहात मोडते पण गराड़ी आणि या वनस्पतीत मोठा फरक आहे. याची फळे कची असल्यावर चेरीसारखी लालसर व पिकल्यावर लालसर तपकिरी होतात.
* ही वनस्पती अडीच ते साडेचार मीटरपर्यंत वाढते. इतर क्लिंस्टेंन्थस १२ मीटर उंचीपर्यंत वाढतात.
* झाडाच्या फांद्यावर केसांसारखे लव असतात व रंग लालसर, पिवळसर हिरवा असतो.
थोडेसे संशोधकांविषयी
डॉ. अलका चतुर्वेदी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवृत्त वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख आहेत.
डॉ. सुभाष सोमकुंवर हे डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमीच्या वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.
डॉ. जगन्नाथ गडपायले हे तुमसरच्या एस.एन. मोर विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
या तिघांनी २०१७ साली 'सुरण' प्रजातीच्या वनस्पतीचा शोध लावला होता.