Join us

नवी ज्वारी,हरभरा बाजारात; तूर, सोयाबीनसह सोने-चांदी स्वस्त !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 9:22 AM

खाद्य तेलावर आयात शुल्क रद्द झाल्याने दर झाले कमी, सरकारने विदेशातून वाढवली आयात

जालना बाजारपेठेत नवीन ज्वारी आणि हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, मका, तूर, सोयाबीनसह सर्व प्रकारचा किराणा आणि सोने-चांदीच्या दरात मंदी आली आहे. या आठवड्यात बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक दररोज २००० पोते इतकी असून, भाव ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. बाहेर देशातून आयात होणाऱ्या तेलावरील ३० टक्के असलेली इम्पोर्ट ड्यूटी घेणे शासनाने बंद केली. त्यामुळे पाम तेल व सोयाबीनचे भाव पडले, असे व्यापारी सांगत आहेत.केंद्र सरकाच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांना आता १००० टनांऐवजी ५०० टन गहू साठवता येणार आहे. त्याचबरोबर रिटेल चेन असणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक दुकानात फक्त पाच टन गहू ठेवता येईल आणि त्यांच्याकडील एकूण साठा एक हजार टनांऐवजी पाचशे टन इतका मर्यादित करण्यात आला आहे.गव्हाची आवक दररोज ३०० पोते इतकी असून, भाव २२५० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तुरीच्या दरात दररोज ३०० ते ४०० रुपयांचा चढ-उतार होत आहे. व्यापारी व गिरणीधारकांसह शासकीय यंत्रणांनी खरेदी सुरू केल्याने तूर दरात घट होणे कठीण दिसते. म्यानमारमधून आयात अपेक्षेप्रमाणे वाढली आणि सरकारनेही आपला साठा सवलतीच्या दरात विकला, तर येत्या काही महिन्यांत तुरीच्या किमतीवर काही दबाव येऊ शकतो, सर्वाच्या नजरा सरकारी खरेदीवर असतील, जालना बाजारपेठेत तुरीची आवक दररोज २ हजार पोते इतकी असून, पांढरी तूर ७२०० ते १०६०० आणि लाल तुरीचे दर ८२०० ते १०२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन-डे असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला गिफ्ट घेण्यासाठी उत्सुक असतो, यातील बरेचजण आपल्या जोडीदारासाठी सोने-चांदी खरेदी करण्यावर भर देतात. अशा काळातच एक आनंदवार्ता आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात सोने-चांदीच्या किमती उतरल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण दिलखुलासपणे सोन्या- चांदीचे खरेदी करू शकतो, सध्या सोन्याचे दर ६२ हजार ५०० रुपये प्रतितोळा आहेत. तर चांदीचे दर ७१ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचलेली आहे.

बाजार भाव : ज्वारी (जुनी) : २३०० ते ४००० ज्वारी (नवी) : २६०० ते ३५०० बाजरी : २१०० ते २६०० मका : २००० ते २२०० पामतेल : ९३०० सूर्यफूल तेल : १०००० सरकी तेल : ९४०० सोयाबीन तेल : ९६०० करडी तेल : १८०००

हरभऱ्याची दरवाढ कायम

• हरभऱ्याचे भाव मागील काही दिवसांपासून वाढतच आहेत.

• त्यामुळे हरभन्याचा भाव सरासरी ५ हजार १०० ते ६ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

• जालना बाजारपेठेत जुन्या हरभऱ्याची आवक दररोज १५० पोते इतकी असून, भाव ४३०० ते ५५०० असे आहेत.

• नवीन हरभऱ्याची आवक दररोज ३०० पोते इतकी असून, भाव ५८०० ते ६३०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारगहूज्वारी