Join us

देशात १,२२३ लाख टन ऊस गाळप करून ११२ लाख टनाचे नवे साखर उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 12:13 PM

३१ डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात एकूण ५११ कारखान्यांनी १,२२३ लाख टन ऊस गाळप करून ११२ लाख टनाचे नवे साखर उत्पादन केले आहे. देशातील सरासरी साखर उतारा ९.१७ टक्के राहिला असून जसजशी थंडीचे प्रमाण वाढेल तसतसा साखर उताऱ्यात वाढ होऊन त्या प्रमाणात साखर उत्पादनामध्ये वाढ अपेक्षित आहे.

३१ डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात एकूण ५११ कारखान्यांनी १,२२३ लाख टन ऊस गाळप करून ११२ लाख टनाचे नवे साखर उत्पादन केले आहे. देशातील सरासरी साखर उतारा ९.१७ टक्के राहिला असून जसजशी थंडीचे प्रमाण वाढेल तसतसा साखर उताऱ्यात वाढ होऊन त्या प्रमाणात साखर उत्पादनामध्ये वाढ अपेक्षित आहे. त्यातच केंद्र शासनाने उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर मर्यादा आणल्यामुळे स्थानिक वापरासाठी देशपातळीवर एकूण नव्या साखरेची उपलब्धता ३०५ लाख टन होण्याची अपेक्षा आहे असे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील १९५ साखर कारखान्यांनी ४२७ लाख टन ऊस गाळप करून ३८.२० लाख टन नवे साखर उत्पादन करून देश पातळीवर अग्रस्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील १२० कारखान्यांनी ३५९ लाख टन ऊस गाळप करून ३४.६५ लाख टन नवे साखर उत्पादन केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटक राज्यात ७३ कारखान्यांमधून २६४ लाख टन ऊस गाळप झाले असून त्यातून २४ लाख टन नवे साखर उत्पादन झाले आहे.

अधिक वाचा: सी हेवी इथेनॉल निर्मितीस लिटरमागे ६.८७ रुपये अनुदान

सरासरी साखर उताऱ्यात मात्र उत्तर प्रदेशाने ९.६५ टक्के उतारा मिळवून आपला अग्रक्रम राखला आहे. त्या पाठोपाठ कर्नाटक राज्याने सरासरी ९.१० टक्के उतारा मिळवून दुसरा क्रमांक राखला आहे आणि साखर उताऱ्यात तिसऱ्या स्थानावर गुजरात असून तिथे सरासरी साखर उतारा ९ टक्के असा आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्राचा सरासरी ८.९५ टक्के साखर उतारा नोंदला गेला आहे. अर्थात जानेवारी महिन्यातील अपेक्षित थंड हवामान लक्षात घेता या साखर उताऱ्यात वाढ होणे अपेक्षित आहे जेणेकरून हंगाम अखेर उत्तर प्रदेशात ११५ लाख टन, महाराष्ट्रात ९० लाख टन, कर्नाटकात ४२ लाख टन तामिळनाडूत १२ लाख टन, गुजरात मध्ये १० लाख टन व इतर सर्व राज्ये मिळून एकूण ३०५ लाख टन नवे साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे.

"हंगामाच्या सुरुवातीला असणाऱ्या अंदाजित २९० लाख टन साखर उत्पादनात जवळपास १५ लाख टनाने वाढ होणे अपेक्षित असल्याने तसेच हंगाम सुरुवातीची शिल्लक, अपेक्षित स्थानिक खप लक्षात घेता इथेनॉल निर्मितीवरील सध्या लादण्यात आलेली बंधने काही प्रमाणात शिथिल होऊ शकतात. त्यादृष्टीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर मिल्स अससोसिएशन संयुक्तपणे केंद्र शासनाकडे याबाबत मागणी करणार आहे" असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले आहे.                

टॅग्स :साखर कारखानेऊसकेंद्र सरकारमहाराष्ट्रउत्तर प्रदेश