मल्चिंग पेपरचा उपयोग करून मिरची रोपट्याची लागवड केली तर त्यासाठी वापरलेला पेपर उन्हामुळे खूप तापतो. त्यामुळे मिरचीची रोपे कोमेजून तर काही रोपे वाळून जातात. त्यावर उपाय म्हणून रामनगर येथील शेतकरी सुरेश नलावडे आणि हरी नलावडे यांनी शेतातील मिरची रोपटे लागवडीसाठी मल्चिंग पेपरसोबत कागदी ग्लासचा वापर करणे सुरू केले आहे. या कागदी ग्लासचे बूड काढून टाकले जाते. कागदी ग्लासच्या आवरणामुळे मिरची रोपाचा अतिरिक्त उष्णतेपासून बचाव होतो. हे ग्लास पंधरा दिवस टिकणे अपेक्षित आहे. कारण पंधरा दिवसांनंतर मिरतीचे रोप वाढीस लागलेले असतात.
नलावडे यांनी या ग्लासचा वापर करून तीस गुंठे जमिनीत सहा हजार रोपे लावली असून प्रति ग्लास तीस पैसे, इतका खर्च त्यांना आला आहे. सध्या परिसरात विहिरींना कमी पाणी असून उपलब्ध पाण्यातही उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना करावा लागत आहे. लागवड केलेली मिरचीचे रोपटे कडक उन्हामुळे कोमेजून जाऊ नये म्हणून मल्चिंग पेपरसोबत आता कन्नड तालुक्यातील रामनगर येथील शेतकऱ्यांनी कागदी ग्लासचा वापर करण्याचा नवीनच फंडा सुरू केला आहे.
मल्चिंग पेपरमुळे होतात हे फायदे
- कमी पाऊस आणि उन्हाचा वाढता पारा यामुळे शेतकरी बांधवांना रोप सुकु नये यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करावा लागतो. मल्चिंग पेपरमुळे काय फायदे होतात?
- मल्चिंगच्या मदतीने भाजीपाल्यासह अनेक पिकांची शेती करणं शक्य आहे.
- मल्चिंग पेपरमुळे तणांची वाढ होत नाही. परिणामी खर्चात कपात होते.
- पिकाला पाणी दिल्यानंतर बाष्पीभवनाने ते उडून जात नाही. पाण्याची बचत होते व मातीत ओलावा टिकून राहतो.
- आच्छादन पेपरच्या खाली सुक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यामध्ये जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात व उगवण २ ते ३ दिवस लवकर होते.