New Variety : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या हळद व वांगी या दोन नवीन वाणांना केंद्रीय उपसमितीने महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित करण्यासाठी मान्यता दिली आहे. यामुळे या दोन्ही वाणांची शेतकऱ्यांना लागवड करता येणार आहे.
उद्यानविद्या पिकांची गुणवत्ता, अधिसूचना आणि वाण प्रसारणासाठी झालेल्या ३१ व्या केंद्रीय उपसमितीच्या बैठकीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याच्या उद्यानविद्या संशोधन केंद्राने विकसित केलेली पीडीकेव्ही वेगवान जीडीटी-०६-०२ हळद वाण व एकेएल बी-९ या वांगी वाणाला महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित करण्यासाठी मान्यता देण्यात आली.
ही दोन्ही वाणे अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली असून, इतर वाणांच्या तुलनेत भरघोस उत्पादन देणारी असल्याचा दावा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या भाजीपाला शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद सोनकांबळे यांनी दिली.
कृषी संशोधनातील महत्त्वपूर्ण योगदान
● या नवीन वाणांच्या मान्यतेमुळे शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार आणि परिणामकारक वाण मिळून त्यांच्या उत्पादनामध्ये सकारात्मक बदल होतील.
● डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विदर्भ विभागातील शेतकऱ्यांसाठी या वाणांच्या विकासामुळे कृषी संशोधनातील महत्वपूर्ण योगदान असल्याचे या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले. या वाण विकासातील सर्व सहभागी शास्त्रज्ञांचे त्यांनी अभिनंदन केले.