अहमदनगर : निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्याच्या प्रश्नावरून वाद पेटला असून पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये शेतकरी आणि आंदोलक जखमी झाले आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात हा राडा झाला. यामध्ये काही शेतकरी आणि नेते जखमी झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून डावा आणि उजवा असे दोन कालवे जातात. त्यापैकी डाव्या कालव्यामध्ये आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात येणार होते. पण परिसरातील सात ते आठ गावातील गावकऱ्यांचा या निर्णयाला विरोध होता. आज प्रस्तावित असलेला कार्यक्रम उधळून लावण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी आणि आंदोलकांनी दिला होता.
आंदोलकांनी इशारा दिल्यानंतर सुरक्षेसाठी आज होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आंदोलकांनी कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये किसान सभेचे नेते अजित नवले यांच्यासहित शेतकरीही जखमी झाले. या राड्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे काम सध्या सुरू आहे. या कालव्याचे काम पूर्ण होऊन त्यात पाणी सोडल्यानंतर डाव्या कालव्यात पाणी सोडावे, डाव्या कालव्यात अगोदर पाणी सोडू नये या मागणीसाठी उजव्या कालवा परिसरातील आठ गावांतील आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्याचबरोबर निळवंडे पाणी हक्क संघर्ष समितीने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता.