Join us

आधार लिंक नाही, मग पिकविमा भरपाई विसरा

By नितीन चौधरी | Published: November 07, 2023 10:13 AM

नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कमदेखील याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. कृषी विभागाने केंद्र सरकारकडे विनंती केली असून, सार्वजनिक वित्त व्यवस्थापन सेवेतून आधार क्रमांक अनिवार्य करण्याची शिफारस केली आहे.

प्रधानमंत्री खरीपपीकविमा योजनेत नुकसानभरपाईस पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम देताना त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे बंधनकारक आहे. यामुळे बनावटगिरी करणाऱ्यांना चाप बसणार असून, योग्य लाभार्थ्यालाच नुकसानभरपाई मिळेल. नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कमदेखील याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. कृषी विभागाने केंद्र सरकारकडे विनंती केली असून, सार्वजनिक वित्त व्यवस्थापन सेवेतून आधार क्रमांक अनिवार्य करण्याची शिफारस केली आहे.

आधार क्रमांक अनिवार्य केल्यानंतर २५ टक्के अग्रिम रक्कमसुद्धा नियमानुसार खात्यात जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या राज्यात पीएम किसान तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार क्रमांकाला जोडलेले आहे. हेच शेतकरी पंतप्रधान खरीपपीकविमा योजनेत देखील सहभागी आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई देताना फारशी अडचण येणार नाही, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला नसल्याने नुकसानभरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्याला मिळत नव्हती. ही रक्कम तशीच पडून राहत होती, असेही सूत्रांची म्हणणे आहे.

बनावट अर्जदारांना बसणार चाप- खरीप पीकविमा योजनेत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड हा निकष लागू झाल्याने एकूण नुकसानभरपाईच्या २५ टक्के अग्रिम रक्कम देण्याची कार्यवाही विमा कंपन्या व कृषी विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची पडताळणी सुरु आहे. मात्र, या पडताळणीत अनेक बनावट अर्जदारांनी दुसऱ्याच्या नावावरील शेती दाखवून स्वतःच अर्ज केल्याचे आढळून आले आहे.- अर्ज करताना बँक खाते क्रमांक स्वतः चा ठेवून अन्य तपशील संबंधित शेतकऱ्याचा कायम ठेवला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई संबंधित शेतकऱ्याच्या नावावर दिसत असली तरी प्रत्यक्ष रक्कम मात्र, बनावट अर्जदाराच्या खात्यावर जमा होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्याला नुकसानभरपाईचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाने आधार क्रमांक जोडलेले बँक खाते ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :पीक विमाशेतकरीपीकपाऊसखरीपपंतप्रधानबँक