Join us

महागडी औषधे फवारूनही होईना फायदा; मिरचीवर व्हायरस पाठोपाठ आता अळीचेही आक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:30 AM

अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे उरलेसुरले अवसानही गळून गेले...

दत्ता मोरस्कर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वासडी (ता. कन्नड) परिसरामध्ये उन्हाळी पिकावर आलेल्या व्हायरसमुळे (कोकडा) त्रस्त असलेले शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत. व्हायरसपाठोपाठ मिरचीवर अळीचाही हल्ला झाला असून, शेतकऱ्यांचे उरलेसुरले अवसानही यामुळे गळाले आहे. त्यामुळे लागवड खर्चही निघतो की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

कन्नड तालुक्यात यंदा मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे. चांगले उत्पन्न मिळून आर्थिक हातभार लागेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. कडक उन्हातही आहे त्या पाण्यावर नियोजन करून हे पीक शेतकऱ्यांनी जगवले. मात्र सुरुवातीपासून या पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला.

त्याला प्रतिबंध करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक प्रकारची महागडी औषधे फवारली, मात्र तो आटोक्यात आला नाही. परिणामी मिरची उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यातच आता पुन्हा मिरचीवर अळीने हल्ला केला आहे. यामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे उरलेसुरले अवसानही गळून गेले आहे. पुन्हा खर्च करून शेतकरी महागड्या औषधांची मिरचीवर फवारणी करत आहेत.

मात्र अळी आटोक्यात येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. काही शेतकऱ्यांची मिरची निघायला सुरूवात झाली आहे, मात्र मिरचीच्या आत हिरवी अळी असल्याने या मिरचीला बाजारात भाव मिळेनासा झाला आहे. रामनगर येथील शेतकरी संजय गायकवाड यांनी दीड एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली होती. अडीच महिने झाल्यानंतर पहिली तोडणी करताच त्यावर व्हायरसचा अटॅक झाला आणि ८० टक्के पीक धोक्यात आले आहे.

विविध प्रकारच्या फवारणी करूनही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. दीपक खुर्दे यांची अर्धा एकर मिरची आणि भारंबावाडी येथील जयलाल राठोड यांचे ५० गुंठे क्षेत्रावरील मिरची पीक व्हायरस व अळीला बळी पडले आहे.

 

रोपे लावल्यानंतर वातावरणात सतत बदल होत होता. अपेक्षेपेक्षा उष्णता जास्त वाढली, त्यामुळे मिरची पिकावर विपरित परिणाम झाला आहे. या वातावरणाचा आणि कोकड्याचा मोठा फटका बसला असून, खर्च निघणेही शक्य होणार नाही. - दीपक खुर्दे, शेतकरी, रामनगर.

शेतकऱ्यांनी व्हायरस येण्याच्या अगोदरच शेतात पिवळे आणि निळे स्टीकर लावून प्रतिबंध करणे गरजेचे आहे. पण एकदा व्हायरस आल्यानंतर तो थांबविणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा. - डॉ. किशोर झाडे, विषयतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर

मी शेतात मिरचीची दहा हजार रोपे लावली होती. खते. फवारणी, निंदणी, मल्चिंग पेपर आणि ठिबक नळ्या असा ७० हजार रुपये खर्च झाला. सध्या मिरचीला १० हजार रुपये क्विंटल भाव सुरु आहे. यानुसार एकरी दोन लाख रूपये उत्पन्न अपेक्षित होते; मात्र रोगामुळे आता खर्चसुद्धा निघणार नाही. - जयलाल राठोड, शेतकरी, रामनगर.

हेही वाचा - ढगफूटी होऊनही शेतात साचले नाही पाणी; बीबीएफ पद्धत शेतकरी बांधवांसाठी ठरतेय वरदान

टॅग्स :मिरचीशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनमराठवाडाशेती क्षेत्र