गळीत हंगाम पूर्ण होऊन सात ते आठ महिने झाले तरी करमाळा तालुक्यातील 'मकाई' व 'कमलाई' या दोन कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले अद्यापही अदा केली नाहीत, या कारखान्याच्या विरोधात जनशक्ती संघटनेने पुणे येथील साखर संकुल येथे आंदोलन केले. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारखान्याला तंबी देत ऊस बिले अदा करा अन्यथा गळीत हंगामास परवानगी देणार नसल्याचे सांगितले.
येत्या सात दिवसांत शेतकऱ्यांची ५० टक्के रक्कम अदा करून येत्या ३० तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांची १०० टक्के बिले अदा करण्यात येतील असे आश्वासन कारखान्यांकडून देण्यात आले. शेतकऱ्यांची बिले मिळत नसल्याने अतुल खुपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती शेतकरी संघटनेने सकाळी सात वाजता साखर संकुल कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर भीक मांगो आंदोलन करून साखर आयुक्त कार्यालयाच्या गेटवर ठिय्या मारला.
यावेळी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 'मकाई'चे चेअरमन भांडवलकर, कार्यकारी संचालक खाटमोडे व 'कमलाई 'चे कार्यालयीन अधीक्षक यांच्यासोबत बैठक लावली.