आज शेतात आलो, बघवत नाही मला. सोबत दावं (दोरी) आणलं असतं तर येथेच झाडाला फाशी घेतली असती. अशा शब्दांत टाहो फोडत नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील एका शेतकऱ्याने नुकसानभरपाई न मिळाल्यास आठ दिवसांत आत्महत्या करण्याचा इशारा व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांची अवस्था किती बिकट आहे, याचा अंदाज येतो.
नांदेड जिल्ह्यात १ ते ३ सप्टेंबरदरम्यान ९३ पैकी तब्बल ६३ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिवृष्टीला आठ दिवस लोटत आले तरी अद्याप शेतातील पाणी ओसरले नाही. सोयाबीनसह इतर पिके शंभर टक्के गेली आहेत; परंतु अद्यापही आमदार, खासदार, मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नुकसान पाहणीच्या सहलीच सुरू आहेत.
त्यातच हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील एका शेतकऱ्याचा हृदयद्रावक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. मारुती रामराव चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे. चार एकर शेतीत त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. पीक जोमात आले होते; परंतु कयाधू नदीला पूर आला आणि चव्हाण यांच्या स्वप्नावर नांगर फिरला.
अख्खे शेतातील सोयाबीन गेले. चव्हाण ज्यावेळी शेतात गेले त्यावेळी पिके पाहून त्यांना धक्काच बसला. त्यानंतर आपल्याजवळील मोबाइलवर त्यांनी दावं सोबत आणलं असतं तर झाडाला फाशी घेतली असती असे म्हणत व्हिडीओच्या माध्यमातून यंत्रणेचे वाभाडे काढले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चव्हाण यांच्या कुटुंबात बारा सदस्य असून त्यांची सर्व भिस्त मारुती यांच्यावरच आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांची समजूत घातली. त्यानंतर मारुती यांनी आठ दिवसांत सरकारने नुकसानभरपाई न दिल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे.
गांजाच झाड लावू द्या, महाराष्ट्र पाहायला येईल
■ मारुती चव्हाण यांनी आपल्या व्हिडीओत आमदार, खासदार कुणीच पाहणी करायला आले नाही. घरात, शेतात पाणी जाऊनही तलाठी बघत नाहीत. ग्रामसेवक फोटो काढून गेले. विमा कंपनीचे लोक आले: पण त्यांनी ३० ते ४० टक्के नुकसान असल्याचे सांगून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या.
■ असा कसा आमच्यावर हा अन्याय. कुणी पाहायलाही येत नाही. गांजाचं एक झाड लावू द्या, महाराष्ट्र पाहायला येतो. तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलिस सगळे येऊन जातील मग असा संताप व्यक्त केला.