Join us

भाव नाही तर कापूसही नाही; कापूस बाजारपेठेवर यंदा युद्धाचाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 4:30 PM

६५ टक्के जिनिंग बंद , मागणी घटल्याने फटका

यंदाही कापसाला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. त्यामुळे बाजारातील कापसाची आवक घटली आहे. याचा परिणाम व्यवसायावर होत असून, कापसाअभावी जिनिंग बंद पडत आहेत. कापूस पट्टा असलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील ८७२ पैकी तब्बल ५६९ म्हणजे ६५ टक्के जिनिंग बंद आहेत. सध्या २५३ जिनिंगवरच खरेदी सुरू आहे.

कापसाच्या बाजारपेठेवरयुद्धांचा परिणाम

सध्या दोन युद्ध सुरु आहेत. युक्रेन व रशिया, तर दुसरीकडे हमास व इस्राईल. या दोन्ही युद्धांमुळे जागतिक व्यापार केंद्राने हात आखडता ठेवला आहे. परिणामी दरवर्षी लाखोंच्या संख्येने चीन, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशियासह जपान या देशांमध्ये निर्यात होणाऱ्या भारतीय कापसाला यंदा उठाव कमी आहे.

देशात कापसाच्या दोन कोटी ९४ लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५ लाख गाठींचे उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तविली आहे. जिनिंगची चाके एका शिफ्टलाच चालत आहेत. याबाबत जागतिक कापूस संघटनेचे (महाकॉट)सदस्य अरविंद जैन यांनी सांगितले की, आखाती देशात बोदवडच्या कापसाच्या गाठी निर्यात होतात; परंतु सध्या इस्रायल व हमास युद्धामुळे निर्यातीवर तीस टक्के परिणाम झाला आहे.

भाववाढीच्या अपेक्षेने शेतकरी माल विक्रीसाठी आणत नाहीत, तर जिनर्सलादेखील ७१०० ते ७२०० रु.चा भाव परवडत नाही. त्यामुळे खान्देशातील अनेक जिनिंग बंद आहेत.- अनिल सोमाणी, खान्देश जिनिंगचे संचालक

कापसाची आवकच नसल्याने पश्चिम विदर्भात जिनिंग बंद पडत आहेत. ज्या सुरु आहेत, त्यादेखील पूर्णक्षमतेने सुरू नाहीत. - अनिल पनपालिया, विदर्भ जिनिंग असोसिएशन

तज्ज्ञांकडून भाव न वाढण्याची चार कारणे

  • सूत उद्योजकांकडे मोठ्या प्रमाणात साठा असल्याने सूतगिरण्यांमध्ये कापसाला मागणी नाही. 
  • निर्यातदार देशांमध्ये सुताची मागणी घटलेली आहे. 

• भारताच्या सुताचे दर इतर निर्यातदार देश अमेरिका व ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहेत. त्यामुळे भारताच्या मालाला उठाव नाही.

  • मुख्य आयातदार बांगलादेशची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे त्या देशातही अद्याप भारताकडून निर्यात सुरू झालेली नाही.

 

 

 

टॅग्स :कापूसबाजारयुद्धमार्केट यार्ड