Join us

आवक वाढल्याने उठाव नाही, कोथिंबीर रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:31 PM

उन्हाळ्यात माल टिकविणे कठीण असल्याने व्यापारीही घेईनात खरेदीची जोखीम

 कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कोथिंबिरीची आवक तब्बल ४९ हजार ५०० जुडी एवढी झाली होती. आवक वाढली आणि उठाव नसल्याने शेतकऱ्यांना समितीच्या आवारातच फेकून द्यावी लागली. कोवळी कोथिंबीर कोणी फुकटही घेईना, अशी अवस्था झाली आहे.

वास्तविक उन्हाळ्यात कोथिंबिरीची मागणी अधिक असते. त्यामुळे दरही चांगले राहत असल्याने शेतकरी त्याचे उत्पादन घेतो. यंदा कोथिंबिरीला पोषक असेच वातावरण राहिल्याने उत्पादन चांगले मिळत आहे. स्थानिक शेतकऱ्यांबरोबरच परजिल्ह्यातील कोथिंबीरही बाजार समितीत येत आहे. सोमवारी समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये सौद्यात सरासरी पाच रुपये जुडीचा दर झाला होता. पण, आवक आणि उठाव यात तफावत राहिल्याने कोथिंबीर शिल्लक राहिली.

मुंबईत कोथिंबीरला १० ते १५ रूपये भाव

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी १ लाख ५८ हजार २०० जुडी कोथिंबीरची आवक झाली. ठोक बाजारात कोथिबीरची जुडी १० ते १५ रूपये या दराने विकली जात आहे. दोन आठवड्यापासून मुंबईत कोथिबीरचे दर स्थिर आहेत. पुणे, नाशिक व इतर परिसरातून आवक होत आहे.

कुजण्याची प्रक्रिया लवकरच होते सुरु

कोथिंबीर नाशवंत आहे. उन्हात ती लगेच खराब होते. त्यामुळे हाताळणी चांगली करावी लागते. कोथिंबिरीची विक्री झाली नाही तर कुजण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने व्यापारीही जोखीम घेत नाहीत. त्यामुळे सोमवारी, मार्केटच्या रस्त्यावर कोथिबीर फेकून दिली होती

टॅग्स :बाजारशेतकरी