Cotton Farmer : कापूस उत्पादक शेतकरी रसशोषक किडी आणि गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने बीटी बियाणे देशात आणले. या वाणाची लागवड केल्यानंतर गुलाबी बोंडअळी पिकावर येणार नसल्याचा दावा करण्यात आला पण सध्या बीटी वाणापेक्षा नॉन बीटी कापूस वाणाचे उत्पादन चांगले होत असल्याचं समोर आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथील कापूस उत्पादक शेतकरी राहुल गोसावी हे मागील जवळपास १५ वर्षांपासून नॉन बीटी कापसाची लागवड करत आहेत. बीटी कापसाच्या वाणापेक्षा नॉन बीटी कापसाच्या लागवडीतून ते दरवर्षी बीटी कापसापेक्षा दुप्पट उत्पन्न घेत आहेत. त्यामुळे नॉन बीटी वाण हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याचं ते सांगतात.
एकरी २७ क्विंटलचे उत्पादनराहुल गोसावी यांनी पाच फूट बाय सव्वा फुटावर कापसाची लागवड केली आहे. मागील पंधरा वर्षामध्ये एका वर्षात विक्रमी २७ क्विंटल एकरी उत्पादन त्यांनी काढले आहे. तर एकाही वर्षी एकरी २० क्विंटल पेक्षा कमी उत्पादन त्यांना मिळाले नाही. त्यामुळे बीटी कापूस वाणापेक्षा दुप्पट उत्पन्न नॉन बीटी वाणातून मिळते असं ते सांगतात.
गुलाबी बोंड अळीवर अटकाव करण्यास सोपेबीटी वाणातील गुलाबी बोंडअळी जास्त फवारण्या करूनही नियंत्रणात येत नाही. तर नॉन बीटी वाणाच्या कापसावरील बोंडअळीला एकदा फवारणी केली तरी ती नियंत्रणात येते. त्याचबरोबर नॉन बीटी वाणाच्या कापसावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे बीटी वाणापेक्षा या कापसाला उत्पादन खर्च कमी होतो असं गोसावी सांगतात.
कापसाला जास्त दरनॉन बीटी वाणाच्या बियांचा आकार तुलनेने कमी असल्यामुळे कमी बियाणांमध्ये जास्त क्षेत्रावर लागवड केली जाऊ शकते. त्याचबरोबर कमी उत्पादन खर्चात आलेल्या नॉन बीटी वाणाच्या कापसाला बाजारात क्विंटल पाठीमागे ५०० रूपये ते १ हजार रूपये जास्त दर मिळतो. त्यामुळे हा देशी वाण शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे.
औषध कंपन्यांचा फायदा?बीटी बियाणांच्या कापसावर जास्त रोग येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीच्या फवारण्या कराव्या लागतात. सध्या बाजारात नॉन बीटी बियाणे उपलब्ध नाही. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बीटी बियाणांचा वापर करून औषध कंपन्यांचा फायदा करावा म्हणून नॉन बीटी बियाणे बाजारात उपलब्ध होऊ दिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय.
बीटी वाणाचा हट्ट का?नॉन-बीटी वाणाचे उत्पादन हे बीटी वाणापेक्षा जास्त असूनही बीटी वाणाचा हट्ट का? आज अनेक शेतकरी बीटी वाणांच्या तुलनेत दुप्पट उत्पादन घेत आहेत. गुलाबी बोंडअळीवर कायमचा तोडगा निघावा म्हणून बीटी बियाणे भारतात आले पण गुलाबी बोंडअळी बीटी वाणाच्या कापसावर जास्त दिसून येते, असं असूनही शेतकऱ्यांना हे सरकार बीटी बियाणे वापरण्याचा सल्ला का देत आहे?- दिपक जोशी (प्रयोगशील शेतकरी, देवगाव, ता. पैठण)