धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील सर्व महसूल मंडळात ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे केवळ पंचनामे करण्यात आले असून अद्यापही तालुक्यातील शेतकऱ्यांना ना नुकसानीची मदत मिळाली ना पीक विम्याचे पैसे. प्रशासन आता विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असल्याने शेतकरी मात्र दुर्लक्षित झाला आहे.
यंदा मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीपमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदींची पेरणी करून घेतली होते. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात जेमतेम व पिकांना पोषक असा पाऊस झाल्याने पीक परिस्थिती चांगली होती. कापूस परिपक्व होण्याच्या अवस्थेत होते तर कपाशी बोंड आळी लगडली होती. यंदा भरघोस पीक येईल असे शेतकऱ्यांना वाटत असताना ऑक्टोबरमध्ये तालुक्याच्या सर्वच भागात परतीच्या पावसाने झोडपले.
पुन्हा सावकाराच्या दारात..
काढणीचा खर्च देखील निघाला नसल्यामुळे शेतकऱ्यांकडे रब्बी पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता रब्बी पेरणीसाठी पुन्हा सावकाराच्या दारात उभे राहावे लागत की काय अशा विवंचनेत ते आहेत. मात्र प्रशासन निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असल्याने शेतकरी दुर्लक्षित होत आहे.
या अतिवृष्टीमुळे एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी नदी, ओढ्यांच्या पुराच्या पाण्यामुळे जमीन खरडून गेली होती. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी केली परंतु नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यांवर आलेली नाही. तसेच अद्याप शासनाकडून मिळणारी मदत देखील आलेली नाही.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळेल, शिवाय पीक विमा कंपनीकडून खात्यावर येईल असे वाटत होते. परंतु अद्याप कुठली मदत मिळालेली नाही.- युवराज काकुस्ते, शेतकरी कासारे ता. साक्री.