राज्यात विधानसभा निवडणुकीचे रणसंग्राम सध्या सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. दररोज गावोगावी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सभा होत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केवळ वाचा फोडण्याचे काम होत असल्याचे आरोप शेतकरी करत आहेत.
कारण सध्या खरीपातील सोयाबीन मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली असून हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होत आहे. यासोबतच कापूस, मका आदी पिकांची देखील अशीच स्थिती बाजारात दिसून येत आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील पेरणी पूर्णत्वाकडे जात आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी वेळेत गहू, मका, हरभरा, कांदा आदी पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. सध्या असे शेतकरीपाणी देत पीक व्यवस्थापन करत आहेत.
विशेष म्हणजे, यंदा राज्य सरकारने ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषि पंपांना मोफत वीज जाहीर केली आहे. मात्र शेतकऱ्यांना या मोफत विजेचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी वीज मिळत नसल्याने शेतकरी रात्री सर्प, विंचू, बिबटे आणि इतर विषारी प्राण्यांचा धोका पत्करून पिकांना पाट पाणी देत आहेत.
यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत. तर नाईलाजास्तव रात्री पाणी देण्यासाठी जावे लागते मात्र आमचे हे दरवर्षीचे दुख: दूर करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, असे छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यातील शिऊर (ता. वैजापुर) येथील शेतकरी सुनील जाधव यांनी सांगितले.
आज बाजारात शेतमालाला खर्चाच्या तुलनेत अल्प दर मिळत आहे. त्यातही शेतकरी मोठ्या उमेदीने शेती करत आहे. मात्र त्याच्या मालाला योग्य दर देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग मोफत वीज देण्याची जाहिरातबाजी करून सरकार मलमपट्टी करत आहे. तेव्हा आमचे एवढेच म्हणणे आहे की, आम्हाला मोफत वीज नको, पण दिवसा वीज हवी. जेणेकरून शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होईल. - नीलेश शेडगे, अहिल्यानगर.
हेही वाचा : कापसाला दर कमी आहे ना? मग कपाशीच्या अवशेषांपासून 'असा' मिळवा अधिकचा नफा