मृग नक्षत्राला मागील चार दिवसांपूर्वीच प्रारंभ झाला असून, पावसाने देखील चांगली सुरुवात केली आहे. त्यात अलनिनोचा प्रभाव कमी झाल्याने यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत उत्साह दिसून येत आहे.
त्यातच रविवारी झालेल्या पावसामुळे शेतकरीखरीप पेरणी करीत आहेत; परंतु शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या साह्याने कामे करून घ्यावी लागत आहे; परंतु कपाशी लागवड, खुरपणी आदी कामांना ३०० रुपये रोजंदारी देऊनही मजूर मिळत नाही, तेव्हा शेतकऱ्यांची चांगलीच फजिती होते.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात मागील चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू झाली होती; परंतु रविवार रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मंठ्यासह परिसरात खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे. शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने नांगरणी, वखरणी आदी कामे आधुनिक यंत्राच्या साहाय्याने केली जात आहेत.
मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कृषी केंद्रांवर बी-बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध झाली आहेत. वेळेवर तुटवडा निर्माण झाला, तर पसंतीचे बियाणे मिळणार नाही म्हणून शेतकरी बियाणांची खरेदी करीत आहे.
दिवसेंदिवस श्रमाची कामे मजुरांना नको वाटत आहेत. त्यामुळे शेती कामाचा सर्व भार शेतकऱ्यांवर पडत आहे. सध्या शेतकऱ्यांना मजूराच्या घरी जाऊन विनवणी करावी लागत आहे. त्यांनी नकार दिल्यास माघारी यावे लागते. परंतु, हे मजूर स्वतःच्या मर्जीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी येत असल्याचे दिसते.
शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक बियाणे खरेदी करावे
● महागडे बी-बियाणे, औषधी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदी आस्मानी संकटाशी दोन हात करत शेतकरी स्वतःच कष्ट करीत आहेत.
● दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक टळावी, त्यांना 3 गुणवत्तापूर्ण बियाणे, खते उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.
● कृषी सेवा केंद्रातून बी-बियाणे, बियाणांची उगम क्षमता, खते, औषधी दुकानदारांच्या नावाचे बिल, किंमत, वैधता, वजन आदींची खात्री करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.
शेतकऱ्यांनी बिलाच्या पावत्या सांभाळून ठेवाव्यात
अधिकृत कृषी केंद्रातून निविष्ठा खरेदी कराव्यात, तसेच दुकानदारांनी जादा पैशाची मागणी केल्यास कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अधिकृत विक्रेते किंवा दुकानदारांनी कृत्रिम टंचाईचा प्रयत्न करू नये, अप्रामाणिक व प्रतिबंधित निविष्ठा शेतकऱ्यांनाविक्री करू नये. निविष्ठा जादा दराने विक्री करू नये. शेतकऱ्यांनी बिलाच्या पक्क्या पावत्या घ्याव्यात आणि किमान हंगाम संपेपर्यंत जपून ठेवाव्यात. जेणेकरून बियाणे शेतकऱ्यांना खराब निघल्यास त्या बिलाच्या पावत्यांचा उपयोग होईल. - अनिल खवणे, कृषी सहायक.