येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे नगदी पीक असले तरी पालखेड लाभ क्षेत्राखाली तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतात शेततळे उभारून द्राक्ष बागेची लागवड केलेली आहे. गेली अनेक वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असून यावर्षी मात्र ना रोगराई ना अतिवृष्टी, ना गारपीट, शेतकऱ्यांचा हंगाम केवळ पर्जन्यमानामुळे लांबणीवर पडणार आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या विहिरी, शेततळे, बोअरवेल कोरडीठाक झाली आहेत.
आतापर्यंत जगून ठेवलेल्या द्राक्षबागा ऐन गोड छाटणीला पाणी नसल्याने छाटणीस उशीर होत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे द्राक्ष बागा जगून ठेवल्या होत्या; पण सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी गोड छाटणी करत असतात. या वर्षी मात्र पावसाअभावी द्राक्ष हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील दोन तीन वर्षांपासून द्राक्षाला बाजारभाव कधी जास्त तर कधी कमी यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे, असे उत्पादन मिळाले नाही.
द्राक्ष बाग म्हटले की एप्रिल छाटणी पासून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची कामे चालू होतात. छाटणी झाल्यानंतर सपकेन केन याबरोबरच काडी परिपक्वतेसाठी विविध औषधांच्या मात्रा देऊन साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्षाची छाटणी करतात; पण गेली दोन-तीन वर्षाचा अनुभव लक्षात घेता. कधी कोरोनाचे संकट तर कधी निसर्गाचे संकट, यातून वाचून द्राक्ष बाग आली तर व्यापाऱ्यांचे संकट यावर्षी मात्र शेतकऱ्यांना पाण्याचे संकट उभे राहिले असून अशा अनेक संकटांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ग्रासल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत.
चालू वर्षात काही शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाला तर काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. चालू द्राक्ष हंगामात टप्प्याटप्प्याने छाटणी करून उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे. यावर्षीही द्राक्ष पिकास बाजार भाव व निसर्ग कसा असेल हे आज जरी सांगणे शक्य नसले तरी पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला नाही.
खर्चातही दिवसेंदिवस वाढ
द्राक्ष पीक दिवसेंदिवस खर्चिक बनत चालले असून औषधे, रासायनिक खते, लिक्विड खते यांच्यात झालेली भरमसाठ वाढ तसेच मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने चार पैसे अधिक देऊन कामे करून घ्यावी लागत आहेत.
दरवर्षी एक सप्टेंबरला अर्ली द्राक्ष छाटणी करत असतो, पण यावर्षी मात्र पावसाचे तीन महिने उलटूनही विहिरी, नदी, नाले कोरडीठाक आहेत. त्यामुळे आता छाटणी करायची आहे; पण पाणी नसल्यामुळे द्राक्ष छाटणी उशिराने घ्यावी लागत आहे. - पांडुरंग बोरणारे, द्राक्ष उत्पादक