केंद्र शासनाने भरडधान्य खरेदीअंतर्गत ज्वारीची खरेदी केली आहे. ऑगस्ट महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना आता पोळीऐवजी भाकरीची चव घ्यावी लागणार आहे.
पुढील किमान दोन तीन महिने तरी स्वस्त धान्य दुकानातून गव्हाऐवजी ज्वारीचेच वितरण पात्र शिधापत्रिकांवर केले जाणार आहे. वाशिम जिल्हा पुरवठा विभागाकडून घेतलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिकांवर गहू आणि तांदुळाचे वितरण करण्यात येते. मागील वर्षभरापासून या दोन्ही शिधापत्रिकांवरील गव्हाच्या वितरणाचे प्रमाण कमी करून तांदळाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.
त्यामुळे अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकांवर प्रतिशिधापत्रिका १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ, तर प्राधान्यक्रम योजनेतील शिधापत्रिकांवर माणसी १ किलो गहू आणि ४ किलो तांदळाचे वितरण होत आहे. आधीच गव्हाचे प्रमाण कमी झाल्याने शिधापत्रिकाधारकांना बाजारात महाग गहू विकत घ्यावा लागत आहे. त्यात आता गव्हाचे वितरणच बंद होत असल्याने या शिधापत्रिकाधारकांची चांगलीच पंचाईत होणार आहे.
कोणत्या योजनेच्या किती शिधापत्रिका?
२००३०६ - प्राधान्यक्रम कुटुंब योजना
५००८३ - अंत्योदय अन्न योजना
शासनाने नाफेडमार्फत भरडधान्य खरेदी अंतर्गत खरेदी केलेल्या ज्वारीचे वितरण स्वस्तधान्य दुकानातून करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्ट महिन्याचे नियतन जाहीर करण्यात आले आहे. पात्र शिधापत्रिकांवर निधारित प्रमाणात ज्वारीचे वितरण होईल. - दादासाहेब दराडे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम.
ऑगस्ट महिन्याचे नियतन जाहीर
शासनाच्या निर्णयानुसार स्वस्तधान्य दुकानातून पात्र शिधापत्रिकांवर ज्यारी आणि तांदळाचे वितरण करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने नियतनही जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदयच्या एकूण लाभार्थीना ५००८.३९ क्विंटल ज्वारी आणि १२५१० क्विंटल तांदूळ, तर प्राधान्यक्रम कुटुंब योजनेच्या लाभार्थीना एकूण ८००६९.७७ क्विंटल ज्वारी आणि ३२६३० क्विंटल तांदळाचे वितरण होणार आहे.
कोणत्या योजनेचे किती लाभार्थी?
२०३३५६ - अंत्योदय अन्न योजना
८०७९७७ - प्राधान्यक्रम कुटुंब योजना
ज्वारीचे वितरणही गव्हाएवढेच ?
शासनाने भरडधान्य खरेदी अंतर्गत खरेदी केलेल्या ज्वारीचे वितरण स्वस्तधान्य दुकानातून करण्याचा निर्णय घेतला असला तरी गव्हाच्या तुलनेत ज्वारीचे प्रमाण मात्र वाढविले नाही. अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजनेंतर्गत जेवढा गहू वितरीत केला जातो. त्याच प्रमाणात ज्वारीचेही वितरण केले जाणार आहे.