शेतकऱ्याकडे आता एक-सव्वा एकर जमीन जरी असेल तरीही त्याला बियाणांचे उत्पादन करता येऊ शकते, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी केले. पुण्यात केंद्रीय सहकार्य संस्थेच्या संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी संपूर्ण यंत्रणेचे संगणकीकरण आवश्यक असल्याचे सांगत अमित शहा यांनी पुण्यात केंद्रीय सहकार संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व इतर नेते उपस्थित होते.
छोट्या शेतकऱ्यांना बियाणे विकसित करण्यासाठी मोठ्या बियाणे कंपन्या संधी देत नाहीत. ज्या शेतकऱ्याकडे 15 ते 30 एकर जमीन आहे अशा शेतकऱ्यांनाच बियाणे विकसित करण्याची संधी दिली जात असे. आता एक दीड एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाही बियाणे विकसित करण्याची संधी मिळणार आहे. बहुराज्य बियाणे उत्पादक सहकारी संस्था शेतकऱ्याला बियाणे तर देईलच पण त्यासोबत भारताचा व जागतिक बाजारपेठेतही त्याला विकले जाईल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बियाणे विकसित करता येतील,असे अमित शहा म्हणाले.
याआधी सहकारी संस्थांना सावत्र आईसारखी वागणूक दिली जात असे पण आता संयुक्त संस्थांमध्ये जशी व्यवस्था असते तशीच व्यवस्था सहकारी संस्थांमध्ये ही आणण्यात येणार आहे. असेही शाह म्हणाले.