आता राज्यात 30 ऑगस्ट 2023 हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा येणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ नारळी पौर्णिमेदिवशी त्यांचा जन्मदिवस म्हणून राज्यात शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे.
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी म्हणून हा दिवस 30 ऑगस्टला साजरा करण्याची मान्यता सरकारने दिली आहे.
कार्यक्रमासाठी कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देता येणार नसल्याने नेमून दिलेल्या तरतुदीतून हा खर्च करण्याच्या सूचना व शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे ही आदेश देण्यात आले आहेत.
कोण आहेत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील?
सहकार क्षेत्रातील तज्ञ डॉ विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक होते. इंग्रज सरकारने आणलेल्या 'तुकडे बंदी आणि तुकडे जोड' विधायकामुळे सावकारांच्या घशात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी हजारो शेतकऱ्यांपुढे भाषण देऊन त्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. पुढे त्यांनी काढलेला प्रवरानगरचा साखर कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्त्वावर चालणारा अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला गेला.
विखे−पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रांत केलेल्या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना १९६१ मध्ये ‘पद्मश्री’ हा किताब दिला.