Join us

आता सातबाऱ्यावर वारस नोंदणी करणे झाले सोपे, घरबसल्या करता येणार अर्ज 

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 16, 2023 4:00 PM

सातबारा उतारा किंवा वारस नोंदणी किंवा जमिनीच्या कोणत्याही प्रकारच्या कामासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारणे शेतकऱ्यांना सवयीचे. पण आता घरबसल्या ...

सातबारा उतारा किंवा वारस नोंदणी किंवा जमिनीच्या कोणत्याही प्रकारच्या कामासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारणे शेतकऱ्यांना सवयीचे. पण आता घरबसल्या जमिनीच्या संदर्भातील वारस नोंदणी, वडिलोपार्जित जमीन, घर, जमीन नोंदणी अशी अनेक कामे घरबसल्या करता येणार आहेत. आता तलाठी कार्यालयात न जाता नागरिकांना ऑनलाईन नोंदणी अर्ज करता येणार आहे.

शासनाच्या महसूल आणि भूमी अभिलेख या दोन विभागांकडून एक ऑगस्टपासून ही सुविधा संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आली आहे. महाभूमी संकेतस्थळावर डिजीटल सातबारा तसेच ई फेरफार अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. यावर नोंदणी केल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.  ऑनलाईन अर्ज करून जमिनीचे काम दाखल करता येणार असून त्याची पडताळणीही ऑनलाईनच होणार आहे. 

कशी कराल वारस नोंदणी? 

यासाठी शासनाच्या महाभूमी संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला लॉगिन करावे लागणार  आहे. त्यानंतर वारस नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल.ऑनलाईनच पेमेंट देखील करता येणार आहे. हा अर्ज तलाठ्याकडे जाईल. तलाठी त्या अर्जाची ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करेल. जर अर्जात कोणत्या कागदपत्रांची कमतरता आईल तर तुम्हाला त्याबाबत इमेलद्वारे कळवण्यात येईल. जर कागदपत्र पूर्ण असतील तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यात येते.

कोणती  कागदपत्रे लागतात?

वारसा नोंदणीसाठी आपल्याला मृत्यू दाखल्याची सत्यप्रत जोडावी लागते. ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते. कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती देण्याकरता रेशन कार्डची प्रत तसेच मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारेही देणे आवश्यक आहे. याशिवाय एक शपथपत्र लिहून यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावे तसेच त्यांचा सम्पूर्ण पत्ता नमूद करणे गरजेचे असते.

वारसा नोंदणी करणे महत्वाचे..

जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४९ नुसार  जमिनीवर आपला हक्क तयार झाल्यावर ३ महिन्याच्या आत आपण वारस हक्क संपादन केल्याचे वृत्त तलाठयाला कळविण्याची जबाबदारी आपली असते. 

जरी काही कारणाने विहित मुदतीत आपण तलाठ्याला कळवू शकलो नाही तरी जमिनीवरचा आपला हक्क जात नाही. मात्र, आपण दंड भरण्यास पात्र ठरतो.  वारस नोंद करण्यासाठी आपण वारस आहोत हे सिध्द करणे आवश्यक आहे. म्हणजेच सर्वात प्रथम आपल्या पूर्वजांचा मृत्यु झाला आहे हे सिध्द करावे लागते. ते आपण आपल्या पूर्वजांचा मृत्युचा दाखला देऊन सिध्द करावे लागते. 

टॅग्स :सरकारऑनलाइनशेतकरी