गावातील जमीनींचा आणि पिकांचा हिशेब ठेवणाऱ्या तलाठ्याला आता त्याच्या उपस्थितीचे वेळापत्रक ग्रामपंचायतीला देऊन कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित रहात नसल्याच्या वारंवार तक्रारी येत असल्याने तसेच सामान्य नागरिकाची गैरसोय होत असल्याने निर्णय घेण्यात आला आहे.
तलाठ्यांना सज्जातील गावांना भेटी देणे, पंचनामे, स्थळ पाहणे, वरिष्ठ कार्यालयांमध्ये असणाऱ्या बैठका, तपासण्या इत्यादी कामांसाठी उपस्थित रहावे लागते. सध्या तलाठी पदाच्या रिक्त जागांमुळे एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तलाठ्यावर कामाचा बोजा वाढला असून अनेकदा सज्जा मुख्यालयीन कार्यालयांमध्ये तलाठ्याला उपस्थित राहता येत नाही. परिणामी, नागरिकांना जमीन, पिके, वारसा हक्काच्या नोंदी अशा अनेक कामांसाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांची ही गैरसोय होऊ नये यासाठी तलाठ्याने नियोजित दौरे, बैठका, कार्यक्रम याबाबत असणारे वेळापत्रक तलाठी कार्यालय तसेच संबंधित गावच्या ग्रामपंचायतीत दर्शनी भागात आगाऊ वेळेत लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वेळापत्रकासोबतच तलाठ्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात आपला दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल अशा स्वरूपात लावण्यासही सांगण्यात आले आहे. संबंधित वेळापत्रक मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांना देखील पाठवण्यात यावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
गाव पातळीवर तलाठी हे नागरिकांसाठी महत्त्वाचे पद असल्याने वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या दाखल्यांसाठी, जमीन विषयक कामांसाठी नागरिकांचा तलाठी कार्यालयाशी संपर्क येतो. सद्यस्थितीत तलाठी पदाची 5 हजार 38 पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रिया सुरू असून ही पदे भरली जाण्यास उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बराच कालावधी जाणार आहे. दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने परिपत्रक जारी केले आहे.