कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यावहारिक शेती केली तर चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते. त्यामुळेच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे जागतिक बँक प्ररस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प संस्थात्मक विकास योजना आयोजित 'आधुनिक कृषी शिक्षणाची संधी: भविष्याची उज्ज्वल नांदी' या विषयावरील कार्यशाळेचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री केसरकर बोलत होते.
मंत्री केसरकर म्हणाले, भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. कृषी शिक्षणासाठी नवा मसुदा तयार झाला असून, चालू वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा मानस आहे.
शिक्षकांना कृषी प्रशिक्षण देणार
राज्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी धडे देताना जिल्हा परिषद शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार केला जाणार आहे. त्या-त्या कृषी विद्यापीठांकडून शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिलीपासून कृषी शिक्षण देण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असे मंत्री केसरकर म्हणाले.