गावरान आंब्याची लज्जत ऐन उन्हाळ्यात चाखायला मिळायची, मात्र सध्या आंब्याच्या झाडांची कमी झालेली संख्या व असलेल्या झाडांवरील निसगीच्या अवकृपेने गळलेला मोहोर यामुळे भविष्यात गावरान आंबा हद्दपार होण्याच्या स्थितीत आहे.
झाडांची संख्या कमी झाल्याने गावरान आंबे मिळणे कठीण झाले आहे. त्याऐवजी महागडे बदाम, केशर, लालबाग, कलमी, निलम हे आंबे आता बाजारात मिळू लागले आहेत. हे आंबे महागडे असल्याने गोरगरिबांना त्याची चव चाखणे कठीण आहे. मात्र पूर्वी भरभरून असलेल्या आमराया आता दिसेनाशा झाल्या आहेत.
भरगच्च आंब्याची झाडे, तसेच आपल्या शेतामध्ये उभी असलेली झाडे मनसोक्त आंबे देत होते. त्यात संत्र्या, गोटी, आमट्या, गोड्या, भदाड्या, काळू अशाविविध नावाने ही आंब्याची झाडी ओळखल्या जायचे, आता मात्र शेतकरी शेतात अधिकाधिक पीक काढण्याच्या चढाओढीत आहे.
त्यामुळे शेतामध्ये सावली देणारे कुठलेही झाड काढून टाकले जात आहे. त्यात बहुतांश आंब्याची झाडांची संख्या कमी होत आहे त्यामुळे अचानक उष्ण व दमट वातावरण निर्माण झाल्याने काही आंबे आले ते पण गळून पडले.
पूर्वी तोडून आणलेले आंबे घरातील विशिष्ट जागेत पिकविण्याकरिता ठेवली जायची, त्यात झाडाला असलेला पाड लज्जतदार लागायचा, ज्या घरात आंबे आहेत. त्या घरात आंब्याचा सुगंध दरवळायचा, घरी आलेल्या पाहुण्यांना चहापाण्याऐवजी पोटभर आंबे खायला मिळायचे.
मात्र आता ती गावरान आंब्याची मजा हद्दपार होत चालली असून, बाजारात मिळणारे इतर महागडे आंबेच त्याची जागा घेऊ लागली आहे. काळ एवढा झपाट्याने बदलत चालला की, सर्वच बाबींमध्ये बदल होत चालला आहे, त्यामुळे गावरान आंबादेखील त्यातून सुटला नाही.
आमरस करण्याकरिता गावरान आंबे हे अत्यंत उत्कृष्ट असतात. मात्र महागड्या आंब्यांमुळे या गावरान आंब्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे तो हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. पाडाला पिकणारा गावरान आंबा आता त्यामुळे पुढील काळात केवळ गीतात ऐकावयास लागणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आंब्याच्या झाडांच्या संख्येत घट
काही वर्षांपासून शेतातील आंब्याच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. यावेळी मार्च महिन्यात अवकाळी पावसाने झोडपले, त्यामुळे आंब्याच्या झाडाची फळे पूर्ण गळाली. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी शेतातील आंब्याचे बहरलेली झाडे काढून टाकली आहेत.
अधिक वाचा: Soil Testing खरीप आला आपल्या मातीचं आरोग्य तपासून घ्या