Join us

Pune Banana Cluster : पुण्यात होणार आता केळीचे क्लस्टर! उत्पादन २ लाख टनावर नेण्याचे उद्दिष्ट्ये; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:52 IST

केळी पिकाखाली इंदापूर, बारामती आणि जुन्नर तालुक्यांमध्ये १ हजार ६११ हेक्टर क्षेत्र असून ६७हजार ६०० टन उत्पादन होते

पुणे : आगामी पाच वर्षात जिल्ह्यात केळी पिकाखाली सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्र आणि उत्पादन सुमारे २ लाख टनांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच उत्पादकता वाढविणे, प्रक्रिया उद्योग, शीतसाखळी निर्मिती आणि बाजारपेठ जोडणी या सर्व बाबींचे नियोजन करत समूह (क्लस्टर) पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने उपस्थित होते. 

डुडी म्हणाले, "केळीची उत्पादकता प्रतिहेक्टरी ४२ वरून ६५ टनांपर्यंत वाढवण्यासाठी शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, निविष्ठांचा योग्य वापर, अधिकाधिक क्षेत्र सेंद्रिय, नैसर्गिक शेतीखाली आणणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, पिकासाठीची सर्व टप्प्यांची प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे या बाबींवर विशेष भर द्यावा लागेल." 

"कृषी विद्यापीठे आणि प्रगतिशील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडील तंत्रज्ञान अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे, या क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत निविष्ठा पुरवठा, ड्रोनसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे आदी कामे करावी लागतील."

केळी पिकाखाली इंदापूर, बारामती आणि जुन्नर तालुक्यांमध्ये १ हजार ६११ हेक्टर क्षेत्र असून ६७हजार ६०० टन उत्पादन होते, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :केळीशेतकरीशेती क्षेत्र