महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड शेतकऱ्यांनी वरकस, पड शेतजमीन व शेताच्या बांधावर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.
मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवडीसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. त्यामध्ये जमिनीचे नवीन सातबारा व ८ अ उतारे, ग्रामपंचायत कार्यालयातून मिळालेले जॉबकार्ड, तसेच आधारकार्ड, बँक पासबुक यांची झेरॉक्स प्रत. शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक, फळबाग लागवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणारा अर्ज भरून द्यायचा आहे.
मग्रारोहयो अंतर्गत विविध फळझाडांच्या कलमांसाठी अनुदान उपलब्ध असून आंबा, काजू, पेरू, नारळ, जांभूळ, बांबू, साग, शिंदी, वनौषधी, ड्रॅगनफ्रूट, अॅव्हॅकॅडो, केळी, सीताफळ आदींचा समावेश आहे. विविध कलमांनुसार हेक्टरी संख्या आणि तीन वर्षांपर्यंत मिळणाऱ्या अनुदानाची माहिती कृषी विभागाशी संपर्क साधून घेता येऊ शकते.
जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत केले आहे. कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क साधावा.