Nuksan Bharpai Anudan :
लातूर : सप्टेंबरमध्ये सतत मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील खरिपातील २ लाख ८२ हजार ४५८ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे होऊन भरपाईपोटी निधीही मंजूर झाला होता. त्यामुळे नुकसानीची मदत कधी मिळणार याकडे लक्ष लागून होते. दरम्यान, चार दिवसांपासून खात्यावर पैसे जमा होत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात होणार आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख ९८ हजार ८३२ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक पेरा नगदी पीक असलेल्या सोयाबीनचा होता. चांगला पाऊस झाल्याने उत्पन्नही चांगले मिळेल, अशी आशा होती; परंतु सप्टेंबरमध्ये सतत मुसळधार पाऊस झाल्याने हाताशी आलेल्या पिकाला मोठा फटका बसला.
प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्यामुळे भरपाईकडे लक्ष वेधले होते. दरम्यान, शासनाने भरपाईपोटी ३८४ कोटी १४ लाख मंजूर केले होते.
आधार प्रमाणीकरणानंतर रक्कम वर्ग...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहेत. आतापर्यंत ७० टक्के याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित याद्या लवकरच अपलोड करण्याचे काम पूर्ण होईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मदतीसंदर्भात वारंवार बँकेत चौकशी होत असल्याचे पहावयास मिळाले.
भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात...
• सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस होऊन जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ४५८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. नुकसानीपोटी शासनाकडून ३८४ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर झाला. संबंधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू असून, ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. अंगठा लावलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
• सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान अहमदपूर तालुक्यात झाले. नुकसानीपोटी ६५ कोटी ६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापाठोपाठ रेणापूर तालुक्यास ६० कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
बाजारपेठेत भावही कमी...
• सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला. बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. नुकसानभरपाईपोटी शासनाने निधी मंजूर केल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाह्य होणार आहे.