Nursery :
पुरुषोत्तम करवा
कधी काळी माजलगाव जिल्ह्याचे भूषण असलेली कृषी विभागाची फळरोपवाटिका डबघाईला आली आहे. मागील वर्षापासून येथे रोपनिर्मिती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर असताप नसून खोळंबा म्हणण्याची वेळ आली आहे.शासनाच्या उदासीनतेमुळे ३२ एकर जमीन पडीक पडली असून नियुक्त अधिकारी येथे फिरकत नसल्यामुळे फळरोपवाटिका उजाड झाली आहे. एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली येथील कृषी विभागाची रोपवाटिका विविध रोपे, फळ उत्पादनात अग्रेसर होती. येथील चिकू, आवळ्याची रोपे दूरपर्यंत विकली जात असत. जिल्ह्यात अनेक तालुक्यांतील शेतकरी येथे रोपे नेण्यासाठी परमिट घेऊन येत असत. मात्र गेल्यावर्षीपासून ही फळरोपवाटिका शासनाच्या उदासीनतेमुळे डबघाईला आली आहे. त्यामुळे तलुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
शासन योजनेतील रोपे गाव सोडून बाहेरगावाहून आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून बाहेर गावाहून रोपे आणण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. एकीकडे शासन फळबागा लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देत असताना दुसरीकडे येथील अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे रोपनिर्मिती बंद झाल्याने येथील रोपवाटीका बकाल झाली आहे.
याकडे मात्र एकाही पुढाऱ्याचे लक्ष दिसून येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष आर्थिक फटका बसत आहे. रोपवाटिकेतील रोपे बनवणे बंद तर आहेच, या ठिकाणी असलेली शेतीदेखील पडीक आहे. त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे.
कृषी विभागच्या या रोपवाटिकेला ५९ एकर जमीन असून त्यातील २० एकरांवर जुनीच फळबाग आहे. त्यात चिकू व आवळ्याची झाडे आहेत. यावर्षी केवळ पाच एकर जमिनीवर पेरणी करण्यात आली असून तब्बल ३२ एकर जमीन पडीक पडली आहे.
येथील जमिनीत काटे कुपाटे, गवत वाढल्याने फेरफटका मारणे मुश्किल झाले आहे. या रोपवाटिकेत चांगल्या खात्रीची रोपे मिळत असत व त्याचा भावदेखील खासगी रोपवाटिकेपेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा या रोपवाटिकेकडे असतो.
यामुळे अनेक शेतकरी येथे रोपे घेण्यासाठी वारंवार चकरा मारतात. परंतु येथे सहा महिन्यांपासून अधिकारी, कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांचा हेलपाटा होतो. वेळीच या जमिनीकडे कोणी लक्ष दिले नाही तर येथे अतिक्रमण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अधिकाऱ्यांतच बेबनाव■ तेलगाव येथील मंडळ कृषी अधिकारी ए. ए. टोम्पे यांच्याकडे २१ जून रोजी येथील प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांनी एक पत्र काढून येथील कृषी चिकित्सालय फळरोपवाटिकेच्या कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार पुढील आदेशापर्यंत दिला होता.■ मात्र माझ्याकडे येथील चार्ज नसल्याचे टोम्पे यांनी सांगितले. तर उपविभागीय कृषी अधिकारी संगेकर यांनी टोम्पे यांच्याकडेच चार्ज असल्याचे सांगितले.
माझ्याकडे चार्ज नाही
माझ्याकडे माजलगाव येथील शासकीय रोपवाटिकेचा चार्ज नाही. त्यामुळे मला याबाबत काही सांगता येणार नाही.- ए. ए. टोम्पे, मंडळ कृषी अधिकारी, तेलगाव
येथील शासकीय रोपवाटिकेत रोपे बनविण्यात येतात की नाही तसेच येथील जमिनीबाबत मला कसल्याच प्रकारची माहिती नाही.- शिवप्रसाद संगेकर, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव