'सर सारखे फोन करतात, शाळेत येण्यासाठी, पण इथं पालावर लहान भावाला सांभाळायला कुणी नाही, मग यावं लागतंय..' सातवीत असलेली पल्लवी सांगते. तर तिचीच लहान बहीण असलेली पूनम म्हणते की, एक महिना झालाय इथं येऊन, आता तोपर्यंत शाळा नाही, आता पट्टा पडल्यावरच शाळा' असं सहजच पूनम बोलून गेली. हे संवाद आहेत, दिंडोरी तालुक्यातील कादवा साखर कारखान्याजवळ असलेल्या पालावरील ऊसतोड कामगारांच्या मुलींचे. एकीकडे शिक्षण घेण्याची आस मात्र परिस्थितीमुळे उदरनिर्वाहासाठी आईवडिलांच्या सोबत हातात पुस्तकाऐवजी कोयता पाहायला मिळतोय, हे वास्तव नाकारून चालणार नाही.
सध्या राज्यात गळीत हंगाम सुरु असल्याने नेहमीप्रमाणे साखर कारखान्यांजवळ ऊसतोड कामगारांच्या वस्त्या दिसून येत आहे. दिंडोरीपासून अवघ्या काही अंतरावर कादवा सहकारी साखर कारखाना असून या ठिकाणी देखील गळीत हंगाम सुरु आहे. जवळपास दोन हजाराहून अधिक ऊसतोड मजूर सध्या काम करत आहेत. पहाटे पाचला जाणारे आई वडील, त्यानंतर संपूर्ण पालावर पसरलेली निरव शांतता, आणि कुठे पालामध्ये लहान मुलांचा आवाज, कुणी सहावी सातवीत किंवा शाळेत न जाणारी एखादी मुलगी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊहन येत असलेलं चित्र पाहायला मिळतं. या ऊसतोड मजुरांच्या पालावरील हे चित्र डोळ्यात अंजन घालणारे आहे. एकीकडे सक्तीचं शिक्षण अभियान राबविले जात असताना दुसरीकडे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय असा सवाल उपस्थित होत आहे.
सुरवातीलाच पालावरील नंबरचा टॅग लावलेल्या झोपडीत पूनम आणि तिचा लहान भाऊ खेळताना दोन भावंडं दिसली. तिसरीत शिकणारी पूनम म्हणाली की, "दिवाळीच्या सुट्टीनंतर थेट ऊसतोडीसाठी इथं यावं लागलं. आई पप्पा, मी दीदी आणि लहान भाऊ आम्ही सगळेच इकडं आलो. आमच्यासोबत गावातील इतरही लोक इथं आले. त्यामुळे शाळेत आता जाता येत नाही, अभ्यास बुडतो. इथली शाळा लांब आणि आणायला, पोहचवायला कुणी नसल्याने आम्ही पालावरच थांबतो.. तिला विचारलं आता शाळा कधी, तर पट्टा पडल्यावर, असं चटकन उत्तर तिने दिलं". तेवढ्यात डोक्यावर हंडा घेऊन येत असलेली तिची मोठी बहीण पल्लवी दिसली. पल्लवी देखील सातवीत शिकते, मात्र आई वडिलांच्या पाठोपाठ ती देखील ऊसतोडणी साठी लहान भावंडांचा सांभाळ करण्यासाठी आलेली होती. पल्लवी म्हणाली की, "शाळा शिकायची आहे, पण फक्त दहावीपर्यंत, मी विचारलं असं का? तर ती म्हणाली. नाही, घरची परिस्थिती नाही, असं दरवर्षी यावं लागतंय. पुढं शिकून तरी काय करणार?" असा सवाल उपस्थित करत पालाच्या आत निघून गेली.
याच पालाच्या पुढं काही चौथी, पाचवी, सहावी इयत्तेत शिकत असलेल्या मुली बसलेल्या दिसल्या. त्यांच्याबरोबर संवाद साधतांना असं समजलं की, पहाटे पाच वाजता आई वडील ऊसतोडणीसाठी बाहेर पडतात. त्यानंतर ते दिवसभर ऊसतोड करून ऊस कारखान्यावर आणून टाकतात. याला सायंकाळ होते. ऊसतोडणी सुरु असल्याने अनेकदा बिबट्याचेही दर्शन होत असल्याने मुलं घरीच ठेवली जातात., असं एक मुलगी म्हणाली. तर दुसऱ्या शाळेबाबत विचारले असता, इथं बालवाडी भरत असे, मात्र ती देखील आता बंद आहे. कारखान्यावर शाळा आहे, मात्र लहान भावंडाना घ्यायला कुणी नसल्याने आम्ही जात नाहीत'... तर दुसऱ्या एका झोपडीजवळ आजीबाई बसलेल्या पाहायला मिळाल्या. आजी म्हणाल्या कि, आमच्याही मुलांनी शाळा शिकावी, मोठं अधिकारी व्हावं असं आम्हालाही वाटतं, पण परिस्थितीमुळ त्यांनाही आमच्यासोबत आणावं लागतं.' अशी खंत आजीबाईने व्यक्त केली.
एकीकडे शासनाच्या माध्यमातून कोणतेही मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी सर्व शिक्षा अभियान राबविले जात आहे. मात्र दुसरीकडे आजही राज्यातील अनेक मुलं आजही शाळाबाह्य असल्याचे वास्तव आहे. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी संसाराचं ओझं वाहत घाम गळणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलं आजही शिक्षणाच्या प्रवाहात गटांगळ्या खात असल्याचे चित्र आहे. एकीकडे सक्तीच्या शिक्षणाच्या नावाखाली साखर शाळा बंद झाल्या, मात्र या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न जैसे थे आहे. याचे वास्तव इथल्या पालावर असलेल्या चिमुकल्यांच्या हातातील 'कोयता' पाहूनच लक्षात येते. एकूणच या मुलांची अशी परिस्थिती पाहून भविष्यात त्यांची पावले शिक्षणाकडे वळतील की नाही, हा संशोधनाचा विषय आहे.