Join us

Oil Seed Farming : पारंपरिक पिकांचे क्षेत्र होताहेत नामशेष; शेतातील तीळ, जवस, कऱ्हाळे केवळ तोंडी लावण्यापुरतेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 2:09 PM

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनकडे शेतकरी वळल्यापासून तालुक्यात इतर तेलबियांचे लागवड क्षेत्र पुरते नामशेष झाल्याचे चित्र आहे. पीक निघेपर्यंत घेतलेल्या मेहनतीचा अपेक्षित परतावा हाती लागत नसल्याने तीळ, जवस, कन्हाळे, करडई, भुईमूग, सूर्यफुल यासारख्या तेलबियांची पेरणी आता केवळ वैयक्तिक उपयोगापुरतीच होत असल्याची स्थिती आहे.

चिखली : खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनकडे शेतकरी वळल्यापासून तालुक्यात इतर तेलबियांचे लागवड क्षेत्र पुरते नामशेष झाल्याचे चित्र आहे. पीक निघेपर्यंत घेतलेल्या मेहनतीचा अपेक्षित परतावा हाती लागत नसल्याने तीळ, जवस, कन्हाळे, करडई, भुईमूग, सूर्यफुल यासारख्या तेलबियांची पेरणी आता केवळ वैयक्तिक उपयोगापुरतीच होत असल्याची स्थिती आहे.

प्रामुख्याने खरीप हंगामात पूर्वी सूर्यफुल, भुईमूग, तीळ, कन्हाळे, करडई काही प्रमाणात जवस आदी पौष्टिक व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या तेलबियांची लागवड होत होती. त्यातून जनावरांनाही पौष्टिक ढेप मिळायची. त्याचा फायदा दुधाळ जनावरांना व्हायचा. मात्र, आता ही पिके शोधूनही सापडत नाहीत. तालुक्यातील खरिपातील एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ ०.१७ टक्के इतक्या अल्प क्षेत्रावर यंदा सोयाबीन वगळता भुईमूग आणि तीळ केवळ या दोनच तेलबियांची लागवड झाली आहे.

केवळ चटणी व इतर घरगुती कारणांसाठीच काही शेतकऱ्यांनी कारळ्ळ्याच्या एखादं-दोन ओळी आपल्या शेतात टाकल्या असतील, त्याचीही नोंद नाही, इतकी गंभीर अवस्था इतर तेलबियांच्या बाबतीत आहे. प्रामुख्याने भुईमूग पीक खरीप, रब्बी व उन्हाळ्यातही काही प्रमाणात घेतले जात असले, तरी त्याचेही प्रमाण अत्यल्प असून, सूर्यफुलाचे पीक पुरते गायब झाले आहे.

तिळाचा वापर इतर अनेक बाबींत होत असल्याने काही प्रमाणात तग धरलेला असला, तरी सूर्यफुल नामशेष झाल्यात जमा आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून सोयाबीनकडे पाहले जात असल्याने बाजारात सोयाबीनचे दर कितीही निच्चांकी स्तरावर गेले तरीही त्याचे क्षेत्र दरवर्षी वाढतच आहे.

'करडई' प्रमाणे प्रयत्न गरजेचे

करडई पिकाला यापूर्वी कधीही राजाश्रय अथवा प्रोत्साहन व आधारभूत किमत मिळत नसल्याने सन २००८ पासून हे पी शेतातून हद्दपार झाले होते. अखेर उशिराने का होईना कृषी विभागाची प्रोत्साहनपर भूमिका व आधारभूत किंमत स्वरूपात या पिकाला एकप्रकारे राजाश्रय मिळाल्याने शेतशिवारातून हद्दपार झालेल्या करडई पिकाचे गतवर्षी धमाकेदार पुनरागमन झाले होते. गत रब्बी हंगामात ३७० हेक्टरावर हे पीक घेतल्या गेले. याचप्रमाणे इतर तेलवर्गीय पीकांसाठीही शासनस्तरावरून प्रयत्नांची गरज आहे.

सोयाबीनवरच जोर अधिक

तालुक्यात खरिपाच्या ८८ हजार ८७४ हेक्टर लागवड क्षेत्रापैकी तब्बल ७३ हजार २०६ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. यामध्ये केवळ १५० हेक्टरव भुईमूग व तीळ या तेलवर्गीय पिकांची लागवड झाली आहे. इतर सर्व तेलवर्गीय पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. यामध्ये भुईमूग १०० तर तीळ ५० हेक्टरवर आहे.

टॅग्स :शेतीशेतकरीपीकशेती क्षेत्रविदर्भरब्बी