यंदा ऐन सणासुदीच्या काळात स्वयंपाकघरातील किराणा मालाच्या वस्तूंसह डाळी, तेलांच्या दरात २० ते २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी, तेल, शेंगदाणे, चणाडाळ यांच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
त्यामुळे जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामात सूर्यफूल आणि करडी पेरण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी आम्ही सूर्यफूल आणि करडीचे तेल विकत न घेता घाण्यातून काढून आणणार असल्याचे यावेळी शेतकरी केशव तेलंग यांनी सांगितले.
केंद्र शासनाने आयात शुल्क १२.५ वरून ३२.५ टक्के केले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर साखर, तेल, रवा, बेसन, खारीक, खोबरे, साबुदाणा, शेंगदाणे आदी प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ केली आहे.
खाद्यतेल, खोबरे, नारळ, चणाडाळ, बेसन, पोहे यांच्या किमतीतही सरासरी १० ते १५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सूर्यफूल आणि करडई पेरण्यावर भर दिला आहे.
खाद्यतेलाचे प्रकार (दर प्रतिकिलो)
करडई तेल | २२० |
शेंगदाणा तेल | २१० |
सोयाबीन तेल | १४० |
सूर्यफूल तेल | १४२ |
सरकी तेल | १४२ |
निवडणुकीनंतर खाद्यतेलाचे दर वाढण्याची शक्यता
दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्यतेलाचे दर वाढविण्यात आले आहे. परंतु, आता विधानसभा निवडणुकीमुळे हे दर स्थिर आहेत. परंतु, निवडणूक झाल्यानंतर सोयाबीन, सरकी, पाम, सूर्यफूल आदी खाद्यतेल १६० ते १८० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. - नितेश तोष्णीवाल, खाद्यतेल विक्रेता जालना.
वर्षभर घाण्यातून खाद्यतेला काढून आणणार
शेतकऱ्यांनी पिकवलेली सोयाबीन कमी दराने खरेदी केली जाते. त्यातून तेल काढल्यानंतर शेतकऱ्यांनाच १४० रुपये प्रतिलिटरने सोयाबीनचे तेल विक्री केले जाते. त्यामुळे यंदा स्वतःच्या शेतामध्येच सूर्यफूल आणि करडईची पेरणी करून वर्षभर पुरेल एवढे तेल घाण्यातून काढून आणता येईल. या उद्देशाने शेतात यंदा करडईची पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. - केशच तेलंग, शेतकरी विझोरा.